दुकाने फोडून धान्य पळविणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:31 AM2021-07-27T04:31:18+5:302021-07-27T04:31:18+5:30
हिंगोली : दुकाने फोडून त्यातील धान्य पळविणाऱ्या तीन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशीम जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक ...
हिंगोली : दुकाने फोडून त्यातील धान्य पळविणाऱ्या तीन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशीम जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक जीप व दुकानातून लांबविलेले धान्य असा १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्ह्यात हिंगोली, गंगानगर, खानापूर चित्ता, कळमनुरी, आखाडा बाळापूर येथील एकूण ५ दुकाने फोडून त्यातील धान्य लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. धान्य चोरणारी टोळी सक्रिय झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. उदय खंडेराय यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक नियुक्त केले. धान्य चोरी करणारी टोळी वाशीम जिल्ह्यात असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यावरून अकोला जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या व ३० ते ४० घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या हसन ऊर्फ इमी छट्टू निनसुरवाले (रा. गवळीपुरा कारंजा) यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने फिरोजखान जसिमखॉन पठाण (रा. कालापाणी, कारंजा लाड) व मोईन ऊर्फ अन्ना चाँद लंगे (रा. कारंजा) यांच्या मदतीने एम.एच.३७ ए ३२६६ क्रमांकाच्या महिंद्रा झायलो कारचा वापर करून चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कार व चोरीला गेलेले धान्य असा १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार बालाजी बोके, संभाजी लेकूळे, विठ्ठल कोळेकर, राजू ठाकूर, ज्ञानेश्वर पायघन, आकाश टापरे, प्रशांत वाघमारे, असलम गारवे, जयप्रकाश झाडे, सुमित टाले, इरफान पठाण आदींचा समावेश होता.
फाेटाे क्र. २६ एचएनएलपी ०७ - आराेपीला जेरबंद करण्यात आले याप्रसंगी उपस्थित पाेलीस अधिकारी व कर्मचारी