दीपावलीच्या साहित्य खरेदीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:30 AM2018-11-05T00:30:18+5:302018-11-05T00:31:01+5:30
दीपावली सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. दिपावलीसाठी लागणारे साहित्यांची दुकाने बाजारात थाटली असून खरेदीसाठी गर्दी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दीपावली सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. दिपावलीसाठी लागणारे साहित्यांची दुकाने बाजारात थाटली असून खरेदीसाठी गर्दी होत आहे. लाह्या-फुटाणे, पणत्या, फटाक्यांची दुकाने सजली असून विविध वस्तुंच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु आहे़ ग्रामीण भागातून मात्र साहित्य खरेदीसाठी तुरळक गर्दीचे चित्र दिसून आले.
दीपावली सण सर्वांचा आनंदोत्सवाचा सण आहे. दिपावली सणानिमित्त हिंगोली येथील बाजारपेठ फुलली असून सणासाठी लागणारे साहित्य खरेदीकरीता ग्राहकांची बाजारात गर्दी होत आहे. दीपावलीच्या मुहुर्तावर अनेकजण नवीन वस्तू खरेदी करतात. त्यामुळे वाहनांच्या नोंदी करून ठेवल्या जात आहेत. कपडे खरेदीसाठीही बाजारात गर्दी दिसून आली असून बाजारातील काही कापड विक्रेते कपडे खरेदीवर आकर्षक सुट देत आहेत. त्यामुळे या कापड दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडत आहे. सोन्याचे दागिने खरेदीकडे महिलांचा कल अधिक असतो़ सराफा बाजारातील दुकानांवर आकर्षक तयार दागिने उपलब्ध झाले आहेत. यासह टीव्ही, फ्रीज, मोबाईल अशा विविध इलेक्ट्रिक साहित्यांची दुकाने सजली आहेत. विद्युत रोषणाईसाठी आकाश कंदील, लाईटींग, सजावटीचे साहित्यांनी बाजार फुलला आहे. दीपावली सणात लागणारे फराळाचे साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे़ रेडिमेड फराळ मागणीही दिवसेंदिवस वाढतच चालली असून ग्राहकांतून पसंती दिली जात आहे. सध्या घरांची रंगरंगोटी करतानाही कुटुंबिय कामात मग्न असल्याचे दिसून येत आहेत.
इकोफ्रेंडली फटाक्यांना मागणी
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर दरवर्षीप्रमाण यंदाही फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. प्रदूषणमुक्त फटाके विक्रीसाठी आले असून इकोफ्रेंडली फटाक्यांना ग्राहकांतून पसंती दिली जात असल्याचे विक्रेते हरी अग्रवाल यांनी सांगितले.
फटाक्यांची दरवाढ झाली नाही. दिवाळी सण अवघ्या एका दिवसावर आला असला तरी, ग्राहकांची गर्दी मात्र यंदा कमी असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. फटाके बाजारात सुर-सुऱ्या, लवंगी फटाके, अनार, चक्री, तड-तडी यासह विविध प्रकारचे फटाके विक्रीस आहेत.
प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी...
प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा प्रत्येकांनी संकल्प करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच प्रदूषणमुक्त दिवाळी सण साजरा करण्याची शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शपथ दिली जात आहे. पालकांनी मुलांना कमी आवाजाचे फटाके घेऊन द्यावेत. कमी आवाजाचे फटाके वाजवून पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी. ध्वनिप्रदूषण, फटाके मुक्त दिवाळी आणि प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र अशा मोहिमा यशस्वीपणे राबविण्यासाठी पर्यावरण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच मोहिमेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.
मातीकलेच्या वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी मिळाली जागा; महाराष्टÑ कुंभार समाज महासंघातर्फे पाठपुरावा
वंश परंपरागत कुंभार समाजबांधव मातीकलेच्या वस्तू विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. परंतु दिवसेंदिवस वाढणारी महागाई, कच्चा मालाच्या वाढलेल्या किंमती तसेच व्यवसायासाठी जागेची वाढलेल्या किंमती व इंधनदरवाढीमुळे कुंभार समाजबांधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे व्यवसायासाठी हक्काची जागा मिळणे गरजेचे आहे. हंगामाच्या काळात विविध सणानिमित्त मातीच्या वस्तूंना मोठी मागणी असते. परंतु मातीच्या साहित्य विक्रीसाठी जागेची अडचण असल्याने शहरातील एखाद्या कोपºयामध्ये कुंभार समाजबांधव वस्तू विकतात. मागील अनेक वर्षांपासून हिंगोली शहरातील गांधी चौकात मातीकलेच्या वस्तू विक्रीस आणतात. परंतु शहरातील वर्दळीच्या ठिकाणी व्यावसायिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण होत असल्याने दुकाने उठविली जातात. त्यामुळे मातीकलेच्या नाजूक वस्तूंची तुटफूट होते आणि व्यावसायिकांचे नुकसान होते. त्यामुळे रामलीला मैदान येथे मातीकलेच्या वस्तू विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्टÑ कुंभार समाज महासंघातर्फे करण्यात आली होती. प्रशासनाने ठरवून दिलेले भाडे भरण्यासही व्यावसायिक तयार झाले.
मातीकलेच्या वस्तू प्रदर्शन व विक्रीकरिता रामलीला मैदानावर जागा मिळावी, या मागणीसाठी महाराष्टÑ कुंभार समाज महासंघातर्फे तहसील प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. अखेर यावर्षी शहरातील रामलीला मैदान येथे स्टॉल उभारून मातीकलेच्या वस्तू विक्रीसाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना आता हक्काची जागा मिळाली आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे जागेचा दर आकारला जाणार आहे. या ठिकाणी आता छोटे-छोटे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी मातीकलेच्या विविध वस्तू ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. दिवाळी सणासाठी लागणाºया व हाताने तयार केलेल्या आकर्षक पणत्याही बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. स्टॉलमध्ये मातीकलेच्या वस्तू विक्रीस आणण्याचे आवाहन महाराष्टÑ कुंभार समाज महासंघाचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर रांजणे यांनी केले आहे.