सूट देऊनही दुकाने सुरू; भरला सात हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:30 AM2021-04-21T04:30:04+5:302021-04-21T04:30:04+5:30
हिंगोली : किराणा सामान खरेदी करण्याच्या नावाखाली काही लोक दिवसभर फिरताना आढळतात. हे पाहून शासनाने किराणा दुकान सकाळी सात ...
हिंगोली : किराणा सामान खरेदी करण्याच्या नावाखाली काही लोक दिवसभर फिरताना आढळतात. हे पाहून शासनाने किराणा दुकान सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा आदेश काढला. परंतु, पहिल्याच दिवशी दोन दुकानदारांनी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी न. प. पथकाने त्यांना सात हजारांचा दंड ठोठावला.
२० एप्रिल रोजी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बहुतांश नगरात किराणा दुकान सकाळी सात ते अकरा या वेळेतच सुरु राहतील, अशी सूचना ध्वनीक्षेपकाद्वारे देण्यात आली होती. ध्वनीक्षेपकाद्वारे केलेल्या सूचनांचे काही दुकानदारांनी पालन केले. परंतु, काहींनी मात्र उल्लंघन केले. यात रिसाला बाजारातील एक व जवाहर रोडवरील एका दुकानाचा समावेश आहे. याचबरोबर तहसील कार्यालय परिसरात दोघे जण विनामास्क फिरत होते. त्यांना पथकाने ‘विना मास्क कुठे चाललात’ असे विचारल्यावर त्यांनी ‘किराणा सामान’ आणण्यासाठी जात आहोत, असे ठेवणीतील उत्तर दिले. कारण पटण्यासारखे नव्हते आणि मास्कही नव्हता. त्यामुळे पथकाने त्यांना एक हजाराचा दंड ठोठावला. ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, उमेश हेंबाडे, पंडित मस्के, श्याम माळवटकर, अनिकेत काकडे, किशोर नाईक, डी. बी. शिंदे यांनी केली.
जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करा
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. नागरिकांच्या सोयीकरिता किराणा दुकानांना पाच तासांची सूटही राज्य शासनाने दिली आहे. तेव्हा नागरिकांनी घरातच बसावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केले आहे.