कृषी पंप वीज धोरण योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:26 AM2021-02-15T04:26:37+5:302021-02-15T04:26:37+5:30
हिंगोली : महावितरणच्या वतीने कृषी पंप वीज धोरणांतर्गंत थकीत बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना विलंब शुल्क आणि व्याजात सूट देण्यात आली ...
हिंगोली : महावितरणच्या वतीने कृषी पंप वीज धोरणांतर्गंत थकीत बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना विलंब शुल्क आणि व्याजात सूट देण्यात आली होती. मात्र, या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र असून, ऑक्टोबर २०२० पासून आतापर्यंत केवळ ६८ लाख २ हजार रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे.
कृषी पंपांना नवीन वीज जोडणी देणे, कृषी ग्राहकांना आठ तास वीज उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा उभारणे व टप्प्याटप्प्याने सवलती देत थकबाकी वसूल करणे या बाबी कृषी पंप वीज धोरणात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मार्च २०१८ पूर्वीच्या वीज जोडणीला प्राधान्य देत नव्या ग्राहकांना अर्जानुसार वीजजोडणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जे शेतकरी २०१५ पूर्वीचे थकबाकीदार आहेत अशा शेतकऱ्यांचे विलंब शुल्क आणि व्याज पूर्णतः माफ करून केवळ रक्कम वसूल करण्यात येत आहे. यातून आलेली काही रक्कम पायाभूत सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार थकबाकी शेतकऱ्यांना वीज बिल भरणा करण्याचे आवाहन वीज वितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले होते; मात्र कृषी पंप वीज धोरणांतर्गत देण्यात येणाऱ्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ७५ हजार २६१ ग्राहकांकडे सप्टेंबर २०२० अखेर १०७९६९.२२ एवढी थकबाकी आहे. तर यातून निर्लेखनाद्वारे महावितरणने २९६४५.८२ एवढी सूट दिली आहे. कृषी वीज धोरणांतर्गंत विलंब आकार व व्याजात सूट म्हणून ९६००.४२ एवढ्या रकमेची सूट देण्यात आली आहे. कृषी वीज धोरणानुसार शेतकऱ्यांकडे ६८७२२.९९ थकबाकी असून, चालू देयक ३१३३.६१ आहे. मात्र, कृषी वीज धोरणांतर्गंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ ६८ लाख २ हजार रुपयांची थकबाकी भरली आहे. थकबाकीअंतर्गंत आलेली रक्कम बघता या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात ७५ हजार २५९ कृषिपंप ग्राहक
जिल्ह्यात ७५ हजार २५९ कृषिपंप ग्राहकाकडे सप्टेंबर २०२० अखेर चालू वर्षाचे वीज देयक रुपये ३१३३.५५ लक्ष एवढी आहे. त्यापैकी औंढा ना. तालुक्यातील १२२५८ ग्राहकांकडे ५४७.०६ लक्ष रुपये, वसमत तालुक्यातील २१ हजार ६८१ ग्राहकांकडे ९६६.५२ लक्ष, हिंगोली तालुक्यातील १२ हजार ४२५ ग्राहकांकडे ४४५.८३ लक्ष, कळमनुरी तालुक्यातील १४ हजार ०५२ ग्राहकांकडे ५१२.१२ लक्ष आणि सेनगाव तालुक्यातील १४८४३ ग्राहकांकडे ६६२.०२ लक्ष चालू वर्षाचे देयक थकीत आहेत.
अन्यथा वीज तोडणार
कृषिपंप ग्राहकांनी चालू वर्षाच्या वीज देयकाचा भरणा करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे. कृषिपंप ग्राहकाने चालू वर्षाचे वीज देयकाचा भरणा न केल्यास त्यांचा तात्पुरत्या स्वरुपात वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यासाठी कृषिपंप ग्राहकांनी आपले थकीत वीजदेयके भरावीत, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
फोटो आहे.