बाजारात नाणेटंचाई, बँकेने आखडता हात घेतला; सोमवारपर्यंत हळद मार्केटयार्ड राहणार बंद
By रमेश वाबळे | Published: April 23, 2024 06:20 PM2024-04-23T18:20:59+5:302024-04-23T18:22:10+5:30
खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे द्यायचे कोठून? व्यापाऱ्यांपुढे प्रश्न
हिंगोली : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात गेल्या दोन आठवड्यांपासून हळदची आवक वाढली आहे. परंतु, बॅंकांकडून पैसे देताना हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे बाजारात नाणेटंचाई निर्माण झाली आहे. तसेच २६ एप्रिल रोजी मतदान असल्याने मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार सोमवारपर्यंत बंद राहणार आहेत.
येथील संत नामदेव मार्केट यार्डात मागील दोन आठवड्यांपासून विक्रमी आवक होत आहे. मराठवाड्यासह विदर्भातून हळद विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे मोजमाप करण्यासाठी दोन-दोन दिवस लागत असल्याने सोमवार ते शुक्रवारदरम्यान हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात येत आहेत, तर शनिवार आणि रविवारी शिल्लक हळदीचे मोजमाप केले जात आहे.
हळद विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी होते. परंतु, बॅंकांकडून मात्र सध्या खात्यातील पैसे काढताना मागणीनुसार दिले जात नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. अशा परिस्थितीत हळदीचे पैसे शेतकऱ्यांना देणे शक्य होत नाही, तसेच २६ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार असून, बाजार समिती कार्यालयात दोन मतदान बुथ राहणार आहेत. मतदानाच्या एक दिवस अगोदरच मतदान बुथ निवडणूक विभागाच्या ताब्यात द्यावे लागणार आहेत. त्यामुळे मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्केट यार्डात शुकशुकाट...
शेतकरी, हमाल, मापाऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या गर्दीने नेहमी गजबजलेले राहणारे संत नामदेव हळद मार्केट यार्डातील व्यवहार २२ एप्रिलपासून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्केट यार्ड परिसरात २३ एप्रिल रोजी शुकशुकाट पाहायला मिळाला. खरेदी केलेला शेतमाल काही व्यापाऱ्यांकडून इतरत्र हलविण्याचे काम सुरू होते.