रेशनवरील धान्य माणसांना खाऊ घालायचे की जनावरांना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:33 AM2021-03-01T04:33:58+5:302021-03-01T04:33:58+5:30
शासनाच्या वतीने रेशन दुकानांमार्फत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी लाभार्थिंना धान्य देण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन ...
शासनाच्या वतीने रेशन दुकानांमार्फत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी लाभार्थिंना धान्य देण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात रेशनच्या धान्यानेच तारले. रेशनचे धान्य मिळत असल्याने अनेक गरजू लाभार्थिंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटण्यास मदत झाली. मात्र मागील काही महिन्यांपासून लाभार्थिंना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरीत केले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एकाच रेशन दुकानाला दिलेल्या धान्यात काही पोतप चांगल्या दर्जाचप तर काही पोतप निकृष्ट दर्जाचे निघत आहेत. त्यामुळे हे धान्य जनावरेसुद्धा खात नसल्याचा सूर लाभार्थिंमधून उमटत आहे. धान्य घेतले नाही तर खावावे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे नाईलाजाने हे धान्य उचलावे लागत आहे.
रेशन दुकानावरील धान्याच्या प्रतीत फरक
१) रेशन दुकानावर पाठविले जात असलेले धान्य एकाच प्रकारचे नसल्याचे चित्र आहे. एकाच दुकानावर आलेले धान्य दोन ते तीन प्रतीचे निघत आहे. त्यामुळे काही पोते चांगले तर काही पोते निकृष्ट निघत आहेत.
२) रेशन दुकानावर गहू व तांदूळ दिले जातात. अनेकवेळा तांदूळ चांगला आला तर गहू खराब निघतो. अन् गहू चांगला आला तर तांदूळ खराब निघतो. याचे लाभार्थिंनाच नुकसान सहन करावे लागत आहे.
३) गोदामामधून चांगले धान्य आणण्याचा प्रयत्न रेशन दुकानदार करतात. मात्र, यातील कोणते धान्य चांगले व कोणते खराब याचा अंदाज येत नसल्याने त्यांनाही लाभार्थिंच्या रोषाला सामोर जावे लागत आहे.
कोणाला किती मिळते धान्य?
१) प्राधान्य गटातील लाभार्थिंना प्रतिव्यक्ती २ रुपये किलोप्रमाणे तीन किलो गहू व ३ रुपये प्रमाणे दोन किलो तांदूळ दिला जातो.
२) अंत्योदय गटातील प्रतिशिधापत्रिकाधारकांना २ रुपयाप्रमाणे २३ किलो गहू व ३ रुपयेप्रमाणे १२ किलो तांदूळ दिला जातो.
३) याशिवाय शेतकरी शिधापत्रिकाधारकांनाही धान्य दिले जाते.
जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका - १८८८७३
अंत्योदय शिधापत्रिका कार्ड - २६३५९
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका - १३१८३८
शेतकरी शिधापत्रिका - ३०७७६
फेब्रुवारी महिन्यात चांगले धान्य
मागील काही महिन्यात निकृष्ट धान्य दिले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यात रेशन दुकानावर चांगल्या प्रतीचे धान्य देण्यात येत असल्याचे लाभार्थी सांगत आहेत. अनेक दिवसानंतर लाभार्थिंमधून धान्य घेण्यासाठी उत्साह दिसून येत आहे.