हिंगोलीत श्री दत्त जयंती साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:39 AM2020-12-30T04:39:44+5:302020-12-30T04:39:44+5:30
हिंगोली : दरवर्षी उत्साहात साजरी होणारी श्रीदत्त जयंती यावर्षी कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील आठ ...
हिंगोली : दरवर्षी उत्साहात साजरी होणारी श्रीदत्त जयंती यावर्षी कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील आठ महिने सर्वच मंदिरे दर्शनासाठी बंद होती. भाविकांच्या मागणीनुसार राज्य शासनाने दिवाळीपासून मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. यादरम्यान मंदिरात गर्दी करु नका, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी सूचनांचे पालन केले जात आहे. २९ डिसेंबर रोजी हिंगोली शहरातील खटकाळी येथील सद्गुरु समर्थ नारायण महाराज संस्थानमध्ये शिवाजी नगर येथील मंदिरात श्रीदत्त जयंतीचा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
खटकाळी येथील सद्गुरु समर्थ नारायण महाराज संस्थान येथे सकाळी श्री दत्तमूर्ती, नारायण महाराज, पुरुषोत्तम महाराज यांच्या समाधीस अभिषेक करुन पूजा करण्यात आली. खटकाळी येथील संस्थानमध्ये दरवर्षी दत्त जयंतीच्या दिवशी भजन, महाप्रसाद आदी कार्यक्रम घेतले जातात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाच्या सुचनांप्रमाणे शहरातील मंदिरात मोठा कार्यक्रम न घेता साध्या पध्दतीने जयंती साजरी करण्यात आली. मंदिर संस्थानच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मास्क लावा व सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना वेळाेवेळी देण्यात येत होत्या.