नव्या वर्षात ‘लिगो’चे काम सुरू होण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 07:00 PM2019-12-20T19:00:05+5:302019-12-20T19:02:41+5:30
लिगो प्रयोगशाळा हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प मागील तीन ते चार वर्षांपासून चर्चेत आहे.
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा परिसरात गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सूक्ष्म चुंबकीय लहरींच्या अभ्यासासाठी प्रस्तावित लिगो इंडिया प्रयोगशाळा प्रकल्पाचे काम जानेवारी २0२0 मध्ये सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्याचे सूत्रांनी सांगितले असून हालचाली गतिमान होत आहेत.
लिगो प्रयोगशाळा हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प मागील तीन ते चार वर्षांपासून चर्चेत आहे. जागा अंतिम झाल्यानंतर भूसंपादन व इतर सुविधांचे आराखडे बनविण्यात मोठा काळ गेला. सरत्या वर्षात भूसंपादनाचे काम पूर्णत्वास गेले आहे. दुधाळा येथे शासकीय ५.९४, वन विभागाचे ८६.९७ तर खाजगी ३0.८५ हेक्टर क्षेत्र, अंजनवाड्यात वनविभागाचे २८.८६ हेक्टर, सिद्धेश्वरचे खाजगी १४.६३ हेक्टर, नांदगावचे वनविभागाचे ४.१५ हेक्टर, सावळी बहेनारावचे खाजगी १.८५ हेक्टर क्षेत्र भूसंपादित केले आहे. यात वनविभागाचे एकूण १२१.८३ हेक्टर एवढे सर्वाधिक क्षेत्र आहे. तर ५३ शेतकऱ्यांचे ४५.४८ हेक्टर खाजगी क्षेत्र आहे. खाजगी जमिनीची खरेदी करून लिगोच्या अधिकाऱ्यांना हस्तांतरण केले आहे. वन विभागाच्या जमिनीसाठी ३१.३६ कोटींचा निधी प्राप्त झाल्याचे सांगितले जात असून वरिष्ठ स्तरावरून कार्यवाही केली जात आहे. याशिवाय लिगो इंडियाच्या प्रयोगशाळा केंद्राकडे जाण्यास रस्त्यासाठी भूसंपादन केले असून त्यासाठीचे २.४४ कोटींचे अंदाजपत्रकही सादर झाले आहे.