हिंगोलीत लव्ह जिहाद व बेकायदेशीर धर्मांतरणाविरोधात मूकमोर्चा
By विजय पाटील | Published: December 8, 2022 01:20 PM2022-12-08T13:20:48+5:302022-12-08T13:21:24+5:30
'देशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करून दोषींवर कठोर कारवाईची तरतूद करावी'
हिंगोली : हिंदू धर्मातील अनेक व्यक्तींचे बेकायदेशीरपणे विविध आमिषे दाखवून धर्मांतरण केले जात असून हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या माध्यमातून पळवून नेवून त्यांची हत्या केली जात असल्याचा आरोप करीत हिंदू धर्मरक्षक हिंगोलीकरांच्यावतीने हिंगोलीत आज भव्य मूकमोर्चा काढण्यात आला.
याबाबत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, पैसे, नोकरी, लग्न आदीचे आमिष दाखवून अथवा धमकावत इतर धर्मामध्ये धर्मांतरण केले जात आहे. तर वायत आलेल्या तरुण हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या आमिषाने त्यांचे धर्मांतरण केले जात असल्याचीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या लव्ह जिहादच्या माध्यमातून फसवणूक होत आहे. या मुलींचा देश विघातक कृती व आतंकवादी कारवायांसाठी वापर केला जात आहे. तसेच अशा मुलींची हत्या केली जात आहे. अशी अनेक प्रकरणे सिद्ध होऊनही दखल ोतली जात नाही. त्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर तसेच देश सुरक्षिततेवर संकट येऊ शकते, असेही निवेदनात म्हटले.
हिंगोलीतील गांधी चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इंदिरा गांधी चौक या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यात महिला व मुलींचाही लक्षणीय सहभाग असल्याचे दिसून आले. यात विविध पक्ष, संघटनांच्या मंडळींनीही सहभाग घेतला होता.
या आहेत प्रमुख मागण्या
यासाठी देशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करून दोषींवर कठोर कारवाईची तरतूद करावी, यासाठी विशेष न्यायालये नेमावीत, या विषयासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा, प्रलोभण, धमकावणे अथवा फसवणुकीने धर्मांतरण रोखण्यासाठी कायद्याने बंदी आणावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, दिल्ली येथील श्रद्धा वालकर हिचा अफताब पुनावाला या जिहादीने केलेल्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यास भरचौकात फाशी द्यावी, संपूर्ण देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा या प्रमुख मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.