साहेब! अंत पाहू नका, दारुमुळे गरिबांचे संसार उघड्यावर आलेत; कधी करणार कारवाई?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 06:33 PM2024-06-13T18:33:41+5:302024-06-13T18:34:21+5:30
नवरा दारु पिऊन गोंधळ घालतोय, केंव्हा करणार दारुबंदी; महिला धडकल्या पोलिस स्टेशनवर
कळमनुरी(जि.हिंगोली): मागच्या काही महिन्यांपासून मुंढळ व परिसरातील अनेक गावांत दारु विक्रीचे प्रमाण वाढले आहे. नवरा दारु पिऊन घरात धिंगाना घालत आहे. दारु विक्रीचा परिणाम मुलाबाळांवरही होऊ लागला असून दारुपायी संसार उघड्यावर पडत आहे. तेंव्हा दारुबंदी त्वरित करावी, अशी मागणी करत महिलांनी पोलिस ठाण्याला निवेदन दिले.
कळमनुरी तालुक्यातील मुंढळ येथे काही महिन्यांपासून खुलेआम दारू विक्री होत आहे. त्यामुळे युवकवर्ग व्यसनाधिन बनू लागले असून घरातील कर्तापुरुष दारु पित असल्यामुळे लहान मुलांवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी १३ जून रोजी कळमनुरीचे पोलिस ठाणे गाठून दारु बंदी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
मुंढळ व परिसरातील अनेक गावांत सर्वच प्रकारची दारु विक्री सुरु आहे. यापुढे दारु विक्री बंद झाली नाही तर पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर मच्छिंद्रनाथ वाघ, महादू पोटे, गफार खान, शेख शेरू, पद्माबाई सोनुले, चंद्रकला पोटे, दुर्गाबाई पोटे, बालाबाई पोटे, लताबाई पोटे, मालनबी शेख, विमल सोनुळे, विमल गुदाल, गोदावरीबाई मोरे, सुरेखा बेले, चंदा रोशने, देवानंद रोशने, शेख मुख्तार, शेख गफार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांना देण्यात आले आहे.
साहेब ! महिलांचा अंत पाहू नका...
दारुबंदी कायमची करा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु दारुबंदी विभागाला याचे काहीच वाटत नाही. आपल्याला दारु विक्रीतून महसूल मिळतो एवढे मात्र दारुबंदी विभागाला चांगले ठावूक आहे. गरीब महिलांचे संसार दारुमुळे उघड्यावर येत आहेत, याचे काहीच दारुबंदी विभाग व तालुका प्रशासनाला काहीच वाटत नाही. महिलांचा अंत न पाहता लवकरात लवकर दारुबंदी करावी, असा इशाराही महिलांनी दिला आहे.