साहेब, टँकर नको; पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवा; खैरखेडा ग्रामस्थांचा झेडपीत ठिय्या
By रमेश वाबळे | Published: April 5, 2024 05:12 PM2024-04-05T17:12:16+5:302024-04-05T17:12:33+5:30
पाण्यासाठी २ कि.मी.ची पायपीट; खैरखेडा ग्रामस्थांचा जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर ठिय्या
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील खैरखेडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. परंतु, या योजनेंतर्गत पाणी मिळणे दूरच, वर्षभराचा कालावधी उलटूनही योजनेचे काम सुरू झाले नाही. परिणामी, ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, संतप्त ग्रामस्थांनी ५ एप्रिल रोजी रिकामे हंडे घेऊन थेट जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन गाठत ठिय्या आंदोलन केले.
खैरखेडा येथे जल जीवन मिशन अंतर्गत ८५ लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेंतर्गत गावाला पाणीपुरवठा होईल आणि गावची पाणीटंचाई दूर होईल, अशी आशा होती. मात्र, योजना मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला तरी काम सुरू झालेले नाही. परिणामी, ग्रामस्थांना प्रखर उन्हात पाण्यासाठी २ कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. एकीकडे शासनाची योजना मंजूर झाली असतानाही पाण्यासाठी पायपीट थांबत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जि. प. कार्यालय गाठून हा प्रश्न थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मांडला. गावचा पाणीप्रश्न तत्काळ सोडवावा, संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी व पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी अमोल मोरे, दीपक खराटे, प्रवीण मोरे, रामेश्वर जाधव, विठ्ठल गव्हाणे, दत्तराव गव्हाणे, केशव शिंदे, देवीदास मोरे, डिगांबर खराटे, साहेबराव मोरे, गणेश मोरे, माणिक गरड, झनक जाधव, निर्मला फड, सत्यभामा मोरे, प्रमिला इंगळे, लताबाई जाधव, शेवंताबाई कुऱ्हे, भागुबाई मोरे, नंदाबाई जाधव, संगीता गरड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
साहेब, टँकर नको; पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवा...
खैरखेडा ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्याकडे पाणीप्रश्न मांडताच त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात टँकरची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. परंतु, पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी करीत रिकामे हंडे घेऊन शेंगुलवार यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत जि.प. कार्यालयातच बसून राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दुपारी ४ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच होते.