सहा पोलिसांवर केली जाते शहरातील गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:34 AM2021-01-16T04:34:42+5:302021-01-16T04:34:42+5:30
हिंगोली शहराची लोकसंख्या जवळपास सव्वा ते दीड लाखांच्या आसपास आहे. शहर व परिसरात गस्तीसाठी दोन दुचाकी तसेच चारचाकी दोन ...
हिंगोली शहराची लोकसंख्या जवळपास सव्वा ते दीड लाखांच्या आसपास आहे. शहर व परिसरात गस्तीसाठी दोन दुचाकी तसेच चारचाकी दोन आहेत. चारचाकी दोन वाहनांपैकी एक शहरात फिरते तर एक डीव्हीजनमध्ये (परिसर) जात असते. चारचाकी वाहनांमध्ये एक बंदूकधारी कर्मचारीही तैनात केलेला असतो. निवडणुकीसाठी बंदोबस्त लागला तर पोलिसांची संख्या कमी होते. त्यामुळे कमी कर्मचाऱ्यांवरच गस्त पार पाडावी लागते. मस्तानशहानगर, पारधीवाडा अशा ठिकाणी मोठे वाहन जावू शकत नाही. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पोलिसांमार्फत गस्त केली जाते. शहरातील सराफा मार्केट, बँक, विविध बँकांचे एटीएम, कपडा गल्ली अशा महत्वाच्या ठिकाणी गस्तीवरील कर्मचारी दहा ते पंधरा मिनिटे थांबतात.
सद्य:स्थितीत हिंगोली शहर पोलीस ठाण्यात ९० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक १, सहायक पोलीस निरीक्षक १, फौजदार ४,महिला पोलीस १०, चालक ४, बीट जमादार ४ इतर पोलीस ६६ असे आहेत. शहर पोलीस ठाण्यासाठी पोलिसांची १२० पदे मंजूर आहेत. परंतु, सद्य:स्थितीत ९० पोलिसांवरच ठाण्याचा कारभार चालवावा लागत आहे. निवडणुकीसारखा बंदोबस्त लागला की, गस्तीवर जाण्यासाठी पोलीस राहत नाही. दिवसपाळी केलेल्या कर्मचाऱ्यालाच गस्तीवर जावे लागते.
शहरातील आझम कॉलम कॉलनी, पेन्शनपुरा, जिजामातानगर, शाहूनगर, सरस्वतीनगर, देवडानगर,सुतारवाडा, मंगळवारा, महादेवावाडी, रिसाला बाजार, नेहरुनगर, सिद्धार्थ कॉलनी, शिवराजनगर, बावन खोली, अण्णाभाऊ साठे नगर, मस्तानशाहनगर, आनंदनगर, हमालवाडा, आंबेडकरनगर, श्रीनगर, शिवाजीनगर, ज्योतीनगर, नाईकनगर, कापड गल्ली, राम गल्ली आदी ठिकाणी पोलिसांची गस्त असते. परंतु, महादेवाडी, गणेशवाडी, सुतारवाडा, पेन्शनपुरा, रिसाला बाजार आदी ठिकाणी गस्तीवरील वाहन जास्त वेळ न थांबता हॉर्न वाजवून निघून जाते, असे येथील नागरिकांनी सांगितले. खरे पाहिले तर रिसाला बाजार सारख्या ठिकाणी मोठे तळे असून भुरटे चोरटे या ठिकाणी दबा धरुन बसू शकतात. तेव्हा अशा ठिकाणी गस्तीवरील पोलिसांनी जास्तवेळ थांबायला पाहिजे. परंतु, जास्त वेळ वाहन थांबत नाही, असे येथील नागरिकांनी सांगितले.
वायरलेसद्वारे नियंत्रण ठेवले जाते
शहरातील रात्रीच्या गस्तीवर कंट्रोल रुममधून लक्ष ठेवले जाते. शहरातील रात्रीची गस्त कुठे कुठे आहे, कोण कोण गस्तीवर आहे, सध्या कुठे आहेत याची इत्यंभूत माहिती कंट्रोलरुममधून घेतली जाते. कंट्रोलरुमधून गस्तीवरील कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिले जाते.
सध्या शहरातील गस्तीसाठी दोन दुचाकी व दोन चारचाकी असे वाहने आहेत. चारचाकी वाहनांपैकी एक शहरात फिरते तर एक परिसरात जात असते. रात्रीच्या गस्तीसाठी सध्या सहा कर्मचारी कार्यरत आहेत.
पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक,हिंगोली शहर