जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात शाळा भरविताच मिळाले सहा शिक्षक
By विजय पाटील | Published: September 13, 2022 07:00 PM2022-09-13T19:00:09+5:302022-09-13T19:01:19+5:30
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावसह २९ शाळांनी संचमान्यतेत चुकीची माहिती भरल्याने विद्यार्थीसंख्या असूनही शिक्षक मिळत नाहीत.
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या गोरेगाव येथील शाळेने संचमान्यतेसाठी चुकीची माहिती भरल्याने शिक्षकांची संख्या घटल्याचा फटका मागील पाच ते सहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना बसत आहे. यावर अखेर ग्रामस्थ आक्रमक झाले असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या कार्यालयात शाळा भरविल्यानंतर या ठिकाणी सहा शिक्षक देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी शिक्षक न दिल्यास कार्यालय फोडू, असा इशारा दिला होता.
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावसह २९ शाळांनी संचमान्यतेत चुकीची माहिती भरल्याने विद्यार्थीसंख्या असूनही शिक्षक मिळत नाहीत. गोरेगावात तर जिल्हा परिषद शाळेत तीन-तीन तुकड्या असताना शिक्षक अपुरे आहेत. पाचवीत १३३ विद्यार्थी अन् शिक्षक ३, सहावीत १४५, सातवीत १३४ अन् आठवीत १३७ विद्यार्थी आहेत. एकूण ४१६ विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक आहेत. या ठिकाणी एकूण १७ शिक्षकांची गरज असताना केवळ ५ शिक्षक आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच आम्हाला शिक्षक मिळाला पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनीही प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केले तरीही चालतील या शाळेत प्रतिनियुक्ती न करता पूर्णवेळ सर्व विषयांसाठी शिक्षक मिळाले नाहीत. तर हे आंदोलन असेच सुरू राहील. तरीही न दिल्यास दालन फोडू असा इशारा दिला. त्यानंतर येथील सहा रिक्त पदे भरण्यात येतील, असे आश्वासन दैने यांनी दिले.
मागील चार ते पाच वर्षांपासून या गावातील नागरिक निवेदनबाजी करीत आहेत. या विद्यार्थ्यांसमवेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, माजी सभापती संजय देशमुख, माजी सभापती रुपाली पाटील गोरेगावकर यांच्यासह गावकरी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन आल्यानंतर जि.प.च्या प्रांगणात पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली.