पक्ष बदलाची सहावी वेळ; शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी मानेंचा भाजपत दुसऱ्यांदा प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:03 PM2022-04-26T12:03:40+5:302022-04-26T12:05:42+5:30
२००४ च्या लोकसभेत पराभव झाल्यानंतर केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमार्गे मागच्या विधानसभेच्या वेळी शिवबंधन बांधले होते.
हिंगोली : माजी खा. शिवाजी माने यांनी सहाव्यांदा पक्ष बदलला असून, भाजपमध्ये दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. शिवसेनेकडून दोनदा खासदार राहिलेल्या शिवाजी माने यांनी सोमवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.
सेनेकडून खासदारकीला पडले असताना २००४ नंतर त्यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमार्गे मागच्या विधानसभेच्या वेळी शिवबंधन बांधले होते. मात्र, दिलेली आश्वासने सेनेने पूर्ण न केल्याने त्यांनी पुन्हा भाजप प्रवेशाचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता; परंतु त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर २५ एप्रिल रोजी हा मुहूर्त सापडला.
मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आ. तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, मिलिंद यंबल आदींच्या उपस्थितीत सोमवारी माने यांनी भाजपप्रवेश केला. सेनेने हिंदुत्वाच्या मुद्यासह आपल्या मूळ विचारधारेपासून फारकत घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत:सह मुलाचे हित पाहत असून, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका माने यांनी पक्ष सोडताना केली.