पाचपैकी तीन संस्थांकडून कौशल्य प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:36 AM2018-04-15T00:36:06+5:302018-04-15T00:36:06+5:30
दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमात शासनाने निवडलेल्या पाचपैकी तीनच संस्थांनी काम केले असून त्यातही एका संस्थेला ५0 चे उद्दिष्ट असताना तिने २५२ जणांना प्रशिक्षण दिल्याने पन्नास टक्क्यांपर्यंत तर उद्दिष्ट गाठता आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमात शासनाने निवडलेल्या पाचपैकी तीनच संस्थांनी काम केले असून त्यातही एका संस्थेला ५0 चे उद्दिष्ट असताना तिने २५२ जणांना प्रशिक्षण दिल्याने पन्नास टक्क्यांपर्यंत तर उद्दिष्ट गाठता आले आहे.
हिंगोली जिल्ह्यासाठी निवडलेल्या पाच संस्थांनी ५२१ जणांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३१६ जणांना प्रशिक्षण दिले जात आहे. यात ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट व एज्युकेशनल सोसायटी सोसायटीला ७0 एवढे उद्दिष्ट होते. प्रत्येक तालुक्यातून १४ जणांना प्रशिक्षण द्यायचे असताना केवण केवळ कळमनुरीचे १४ व औंढ्याचे २0 अशा ७0 जणांनाच संधी मिळाली. कॅपस्टॉन फॅसिलीटीज मॅनेजमेंट प्रा.लि. या संस्थेला ५१ चे उद्दिष्ट होते. यालाही प्रतिसाद न मिळाल्याने २९ जणांना प्रशिक्षण दिले. ओरियन एज्युटेकला ३00 एवढे मोठे उद्दिष्ट असताना या संस्थेने काहीच केले नाही. असाच प्रकार नाईस कॉम्प्युटर एज्युकेशन सोसायटीचा असून ५0 प्रशिक्षणार्थ्यांचे उद्दिष्ट असूनही कामच केले नाही.
इंण्डो जर्मन टूल रूम या संस्थेला मात्र केवळ ५0 एवढे उद्दिष्ट असताना त्यांनी हिंगोली-६५, कळमनुरी-४२, वसमत-५६, औंढा-२५, सेनगाव-६४ अशा २५२ जणांना प्रशिक्षण दिले आहे. या योजनेत ज्या संस्था कामच करीत नाहीत, अशांची निवड करण्यामागे शासनाचे गणितच कळत नाही. तर प्रशिक्षणही त्याच त्या प्रकारचे राहात असल्याने बाजारपेठेत रोजगार मिळत नाही. त्यामुळे प्रशिक्षणातील इतर पर्यायही उपलब्ध होणे गरजेचे आहे.
ओरियन एज्युकेशन सोसायटीला उद्दिष्ट जास्त देण्यामागे त्यांच्याकडे विविधता असलेले अभ्यासक्रम हे कारण असावे. मात्र त्यांनी प्रशिक्षणच न घेता यावर पाणी फेरले आहे. या संस्थेकडे बीपीओ व्हाईस अॅण्ड कॉम्प्युटर हार्डवेअर असिस्टंट, हॉस्पिटॅलिटी असि. अॅण्ड हाऊसकीपर, ड्रायव्हर कम कुरियर अॅण्ड ज्युनियर क्लर्क, आॅफिस असिस्टंट, टेलर अॅण्ड इंडस्ट्रियल सेविंग मशिन आॅपरेटर, सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन इन पॅटर्न मेकींग आदी प्रकारच्या प्रशिक्षणाचा यात समावेश होता.