आरक्षणासाठी अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतली झाडावरुन उडी; पत्नी, मुली देखत सोडले प्राण
By विजय पाटील | Published: October 31, 2023 07:52 PM2023-10-31T19:52:19+5:302023-10-31T19:52:38+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शेतातील झाडावर चढून उडी घेतली.
हिंगोली: वसमत तालुक्यातील अकोली शिवारातील शेतात अल्पभूधारक ४८ वर्षीय शेतकऱ्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्वतः च्या शेतातील झाडावर जाऊन उडी घेतली. याचदरम्यान शेतात पत्नी व मुलगी कापूस वेचत होते. पत्नी व मुलीच्या डोळ्यादेखत शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
वसमत तालुक्यातील अकोली शिवारात ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:४५ वाजेदरम्यान अल्पभूधारक शेतकरी लिंबाजी धोंडिराम कदम (वय ४८) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शेतातील झाडावर चढून उडी घेतली. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यावेळी मयत शेतकऱ्याची पत्नी व मुलगी शेतात कापूस वेचत होते. त्यांना आवाज येताच त्या दोघीनींही झाडाकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत लिंबाजीने प्राण सोडला होता. दोघींच्या डोळ्यादेखत हृदय हेलावणारी घटना घडली. त्यामुळे जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे.
मयत शेतकऱ्याच्या पश्चातपत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शेतकऱ्यास दीड एकर शेत जमीन आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, जमादार संजय गोरे, अजय पंडित हे पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.