टपाल वाहतुकीच्या नावाखाली गुटख्याची तस्करी; हिंगोलीत २८ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 03:19 PM2020-08-29T15:19:35+5:302020-08-29T15:26:26+5:30
ट्रकचालकाने हा टपाल पार्सल वाहतुकीचा माल असून तो सीलबंद असल्याने सील तोडता येत नाही, अशी बतावणी केली.
आडगाव रंजे, जि.हिंगोली : टपाल पार्सलची वाहतूक करीत असल्याची बतावणी करीत १३ लाखांच्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह २८.७१ लाखांचा मुद्देमाल वसमत तालुक्यातील झीरोफाटा-हट्टा मार्गावर २८ आॅगस्ट रोजी रात्री १०.२० वाजता हट्टा पोलिसांनी जप्त केला.
परभणी- हिंगोली रस्त्यावरील झिरोफाटा ते हट्टादरम्यान एका महाविद्यालयासमोर रात्री दहाच्या सुमारास हिंगोलीकडे जाणारा सीलबंद कंटेनर गुटखा घेवून जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी थांबवून चौकशी केली. मात्र ट्रकचालकाने हा टपाल पार्सल वाहतुकीचा माल असून तो सीलबंद असल्याने सील तोडता येत नाही, अशी बतावणी केली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर अधिक चौकशी केल्यावर यात चप्पल, बुट असल्याचे त्याने सांगितले. अखेर पोलिसांनी या वाहनाचे सील तोडले.
महत्वाचे : राजेंद्र देशमुख यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द
तेव्हा सुरुवातीला दहा-वीस कार्टून चप्पल व बुटांचे असल्याचे आढळले. नंतर संपूर्ण पानमसाला गुटखा आढळून आला. यामध्ये राजनिवास पानमसाला गुटख्याच्या अंदाजे ५२ गोण्या आढळल्या असून याची एकूण किंमत १५ लाख १४ हजार होते. तर प्रीमियम जर्दा तंबाखूचे अंदाजे तेरा पोते एकूण किंमत ३ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल आढळून आला आहे. जप्त केलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची किंमत १८ लाख ७१ हजार आहे. तर दहा लाख रुपये किमतीचे आयशर एमएच ०४ एचवाय - ७९३७ हे वाहनही जप्त केले. असा एकूण २८ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला आहे .
ही कारवाई सपोनि गजानन मोरे, पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे, पोलीस कर्मचारी शेख मदार, श्रीधर शिंदे, प्रवीण चव्हाण यांनी केली. मोरे यांच्या फिर्यादीवरून चालक संजय देवराव मडावी, कैलास शिवाजी कादबाणे रा. खडद ता. पुरंदर जि. पुणे व त्याचा मालक याच्याविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मडावी व कादबाणे या दोघांना ताब्यात घेतले आहे.
शिवसेना - राष्ट्रवादी संघर्ष वाढणार ?https://t.co/AdPnaz9bAg
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 29, 2020