दुचाकीवरील महिलेची बॅग पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:37+5:302021-01-18T04:27:37+5:30
वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील नवीन महामार्गावरून एक नवविवाहित जोडपे दुचाकीवरून जात असताना चोरट्यांनी महिलेच्या हातातील ...
वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील नवीन महामार्गावरून एक नवविवाहित जोडपे दुचाकीवरून जात असताना चोरट्यांनी महिलेच्या हातातील बॅग पळविल्याची घटना घडली आहे. चोरट्यांचा रामेश्वर शिवारामध्ये पोलीस व ग्रामस्थांकडून शोध घेणे सुरू आहे.
वारंगा फाटा पोलीस मदत केंद्राचे बीट जमादार शेख बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जानेवारी रोजी अर्धापूर तालुक्यातील लाेण येथील एक नवविवाहित जोडपे दुचाकीवरून हदगाव येथून वारंगा फाटाकडे येत होते. त्याच मार्गावरून पाठीमागून दोन चोरटे दुचाकी क्रमांक एमएच १४ जीके २९१७ वरून आले. त्यांनी नवविवाहित महिलेकडील बॅग हिसकावून त्या ठिकाणाहून पळ काढला. सदरील जोडप्याने वारंगा फाटा येथील पोलिसांना याविषयी तत्काळ माहिती दिली. बीट जमादार शेख बाबर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांना दिली. यानंतर त्यांनी चोरटे डोंगरकडाहून जवळा पांचाळमार्गे रेडगाव शिवारात आले असावेत, अशी माहिती शिवाजी सवंडकर यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानुसार सवंडकर ग्रामस्थांसह या रस्त्यावर आले. यातील एका चोरट्याने सवंडकर यांच्या दिशेने दगड फेकून मारल्याने त्यांच्या पायाला मार लागला आहे. या चोरट्यांकडे चाकू, खंजर, पिस्तूल हत्यार पाहिल्याचे सवंडकर यांनी सांगितले.
या दरम्यान रेडगावहून मोठ्या संख्येने लोक येत असल्याचे दिसताच चोरट्यांनी दिग्रस बुद्रुककडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याने पळ काढला. हा रस्ता अतिशय खराब असल्याने दुचाकी जाऊ शकत नसल्या कारणाने चोरट्यांनी बजाज पल्सर कंपनीची दुचाकी जागेवर सोडून या शिवारातून पळ काढला आहे. रामेश्वर परिसरामधील शेतशिवारामध्ये चोरटे गेले असल्याची माहिती मिळाली. यानंतर रेडगाव, दिग्रस, रामेश्वर, दांडेगाव परिसरातील ग्रामस्थ व आखाडा बाळापूर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या जोडप्याकडील पळविलेल्या बॅगमधील माेबाइलवरून चाेरट्यांचा शाेध घेण्यात येत हाेता. या प्रकरणी गुन्हा नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
फाेटाे नं.१५