..तर लस देता का लस? म्हणण्याची वेळ येईल नागरिकांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:19 AM2021-07-23T04:19:07+5:302021-07-23T04:19:07+5:30
हिंगोली : कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस सध्या जिल्ह्यात कमीच आहेत. त्यामुळे ‘लस देता का लस’ असे म्हणण्याची ...
हिंगोली : कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस सध्या जिल्ह्यात कमीच आहेत. त्यामुळे ‘लस देता का लस’ असे म्हणण्याची वेळ पुढे चालून नागरिकांवर येऊ शकते, तर दुसरीकडे दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच दोन्ही लसींचा साठा असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात लसीकरणासाठी २९ केंद्रे आहेत. आतापर्यंत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे दोन लाख ५४ हजार ४७६ डोस नागरिकांना दिले आहेत. यामध्ये १८ ते ४५ वयोगटात पहिला डोस ७२ हजार ४८९, तर दुसरा डोस दाेन हजार ४४८, वयोगट ४६ ते ५९ मध्ये पहिला डोस ५७ हजार ३४९, दुसरा डोस १९ हजार ६६८ तर ६० पेक्षा जास्त वयोगटामध्ये पहिला डोस ५६ हजार ३८३, तर दुसरा डोस १५ हजार ४६५ या प्रमाणे डोस दिले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात तीन हजार डोस शिल्लक असून, शासनाकडे मागणी केल्यानंतर कोविशिल्ड तीन हजार, तर कोव्हॅक्सिन दोन हजार २४० लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. २२ जुलै रोजी आलेले लसींचे डोस दोन ते तीन दिवस पुरतील, असेही सांगितले. लस संपण्यापूर्वी दुसरी लस येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.
कोरोना महामारीची तिसरी लाट समोर असल्यामुळे नागरिक लसीकरण करून घेत आहेत. परंतु, लसींचा पुरवठा शासनाकडून कमी होत असल्यामुळे लस पुढे चालून मिळते की नाही, हा प्रश्न आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण
१८ ते ४५ वयोगट
पहिला डोस ७२,४८९, दुसरा डोस २४४८
४६ ते ५९ वयोगट
पहिला डोस ५७,३४९
दुसरा डोस १९.६६८
६० वर्षांवरील
पहिला डोस ५६,३८४
दुसरा डोस १५,४६५
बॉक्स...
शासकीय रुग्णालयात कमी प्रमाणात लस....
आजमितीस शासकीय रुग्णालयात दोन्ही लस मिळून पाच हजार २४० डोस नवीन आले आहेत. दोन दिवसांपूर्वी चार हजार डोस शिल्लक होते. आता दोन ते तीन दिवस लस पुरेल, असे सांगण्यात आले. दुसरीकडे खासगी रुग्णालयात पैसे देऊनही लस मिळत नाही, असेही नागरिकांनी सांगितले.
प्रतिक्रिया....
कोरोना होऊ नये म्हणून शासनाने सर्वांसाठी मोफत लसीची व्यवस्था केली ते एकप्रकारे चांगलेच झाले आहे. परंतु माझा दुसरा डोस राहिला आहे. हा राहिलेला डोस मिळतो की नाही, हाही मोठा प्रश्न आहे.
-विठ्ठल सुरुशे
कोरोनाच्या भीतीने नागरिक लसीकरण करत आहेत. आरोग्य विभागाने लस संपायच्या आत पाठपुरावा करायला पाहिजे. परंतु, तसे होताना काही दिसून येत नाही. दोन महिन्यांपूर्वी लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद राहिले होते.
- प्रभाकर मुखमहाले
प्रतिक्रिया...
जिल्ह्यातील २९ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दोन्ही लसींचे डोस नागरिकांना कमी पडणार नाहीत. तेव्हा नागरिकांनी वेळेवर व जवळच्या केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता लसीकरण आवश्यक आहे.
- डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, लसीकरण अधिकारी