महामार्गाच्या कामात मातीचा भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:02 AM2018-12-26T00:02:58+5:302018-12-26T00:03:41+5:30
तालुक्यात रिसोड-सेनगाव-हिंगोली सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी काळ्या मातीचाच भराव करण्यात येत असल्याने आ. रामराव वडकुते यांच्यासह रिधोरा येथील ग्रामस्थांनी २५ डिसेंबर रोजी रस्त्याचे काम बंद पाडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यात रिसोड-सेनगाव-हिंगोली सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी काळ्या मातीचाच भराव करण्यात येत असल्याने आ. रामराव वडकुते यांच्यासह रिधोरा येथील ग्रामस्थांनी २५ डिसेंबर रोजी रस्त्याचे काम बंद पाडले. कामाचा दर्जा तपासला जात नाही, तोपर्यंत काम सुरू होवू देणार नाही. अशी भूमिका यावेळी आ. वडकुते यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली.
तालुक्यात हिगोली-रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. रिसोडपासून सुरू केलेल्या रस्त्याचे खोदकाम सेनगाव-हिगोलीदरम्यान रिधोरा पाटीजवळ पोहोचले. या संपूर्ण रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होणार असून प्रारंभी या रस्त्याचे काम पानकनेरगावपर्यंत कसे झाले, हे देवजाणे. परंतु सेनगावपासून पुढे या रस्त्याच्या कामात संबंधित कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी थातूरमातूर खोदकाम करुन त्यात मुरुमाऐवजी काळ्या मातीचा भराव टाकल्याने याविरोधात रिधोरा येथील ग्रामस्थ व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंगळवारी रस्त्यावर उतरले. रस्त्याचे काम दर्जात्मक होत नसल्याचा आरोप करून कार्यकर्त्यांनी याबाबत आ. वडकुते यांच्याकडे तक्रार केली. मंगळवारी दुपारी ११ वा. सदर कामाची आ. वडकुते यांनी ग्रामस्थांसह पाहणी केली. रस्त्याच्या कामात मातीचाच भराव असल्याचा प्रकार समोर आला. कामाचा दर्जा अत्यंत खराब असल्याने वडकुते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरिता शासनाने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. असे असताना कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. अंदाजपत्रकानुसार खोदकाम करण्यात येत नाही. झालेल्या खोदकामामध्ये मुरुमाऐवजी काळ्या मातीचा भराव टाकल्याचा प्रकार गंभीर आहे. सदर काम बंद करण्याचा सूचना देत झालेल्या कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे केली.
यावेळी आ. वडकुते यांच्यासह नगराध्यक्ष संदीप बहिरे, रवींद्र गडदे, माधव कोरडे, विकास शिंंदे, माधव गाडे, रामप्रसाद कोटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.