हिंगोली जिल्ह्यात हत्ता, घोरदरी येथे उभा राहणार सौर कृषी वीज केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 06:01 PM2018-01-03T18:01:54+5:302018-01-03T18:02:21+5:30
हत्ता व घोरदरी येथे आगामी काळात प्रत्येकी २ मेगावॅटचे सौर कृषी वीज केंद्र उभे राहणार असून त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.
हिंगोली : हत्ता व घोरदरी येथे आगामी काळात प्रत्येकी २ मेगावॅटचे सौर कृषी वीज केंद्र उभे राहणार असून त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात २0१७ सिद्धी ते २0१८ संकल्प या विषयावरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जि.प.सीईओ एच.पी.तुम्मोड, अति.जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, अति.मुकाअ ए.एम. देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, कृषी अधीक्षक विजय लोखंडे, माहिती अधिकारी सूर्यवंशी आदीसह विविध विभागांच्या अधिकार्यांची उपस्थिती होती.
यापूर्वी झालेली वैशिष्ट्यपूर्ण कामे व आगामी काळातील संकल्पांविषयी यात माहिती देण्यात आली. यावेळी भंडारी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही संकल्पना आहे. महानिर्मितीमार्फत हे काम केले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी चार हेक्टर जागा लागणार आहे. लवकरच गायरान जमिनीचे हस्तांतरण केले जाणार आहे.
यावेळी जिल्हा उपनिबंधक सुधीर म्हैत्रेवार म्हणाले, कर्जमाफीचे आॅनलाईन १.०९ लाख अर्ज प्राप्त झाले. ३५ हजार ६३७ शेतकर्यांना ११७.३४ कोटी मंजूर झाले. यापैकी २९ हजार ५६ शेतकर्यांचे ८५.९१ कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले. तर पूर्वी तीन बाजार समितीत लिलाव व्हायचा. आता सर्वच बाजार समित्यांत लिलाव होत आहे. उपबाजारपेठांमध्येही ही सुविधा केली जाणार आहे. ८५ सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण केले जाणार आहे. तर हिंगोली व सेनगाव बाजार समितीचा ई-नाममध्ये सहभाग होईल.
वनविभागाचे केशव वाबळे म्हणाले, अंजनवाडा गावच्या वन समितीस राज्य स्तरावरील चौथा पुरस्कार मिळाला. तर तेंदूच्या ११ घटकांतून २.१६ कोटींचा महसूल मिळाला. बोनस ३८.३४ कोटी वाटप केला जात आहे. वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानाबद्दल १५00 शेतकर्यांना १४.१५ लक्ष रुपये वितरित केले आहेत. अतिक्रमण निर्मूलनात ६0५ हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमणे काढली.
कृषी अधीक्षक विजय लोखंडे म्हणाले, यांत्रिकीकरण योजनेत २७६ ट्रॅक्टर व २१६ अवजारे वितरित केले. ८0 सामूहिक शेततळे घेतले आहेत. तर ठिबक व तुषार सिंचनासाठी १0 कोटी मिळाले आहेत. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेत दहा गावांची निवड झाली असून शेती सिंचन व जोडव्यवसायासाठी ही योजना आहे. सेनगाव तालुक्यातील लिंगदरी, जामदया, गोंडाळा, उमरदरी या गावांत पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे.
रेशीम लागवडीत जिल्हा दुसरा
रेशीम अधिकार्यांनी हिंगोली जिल्हा रेशीम लागवडीत राज्यात दुसरा असल्याचे सांगितले. यात २00 एकरचे उद्दिष्ट असताना ७८८ एकरवर लागवड झाली. तर येत्या दोन वर्षांत २ हजार हेक्टरवर लागवड नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तर जिल्हाधिकारी भंडारी यांनी आगामी काळात रेशीम उत्पादकांना गटशेतीचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. शिवाय ६८४ गावांचे आॅनलाईन सातबाराचे काम झाले असून १३ गावे शिल्लक राहिल्याचे सांगितले. तर हस्तलिखिताप्रमाणे सातबारा नसल्यास त्याची अजूनही दुरुस्ती करणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.
दोन तालुके हागणदारीमुक्त
सीईओ एच.पी. तुम्मोड म्हणाले, स्वच्छ भारत योजनेत १.८१ पैकी १.६१ लाख कुटुंबांनी शौचालय बांधकाम केले. हे काम ९१.१४ टक्के एवढे आहे. ५६३ पैकी ३९६ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. हिंगोली व औंढा हे दोन तालुके हागणदारीमुक्त झाले. २0 जानेवारीपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होणार आहे. घरकुल योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात दुसरा आहे. तर लोकवाट्यातून १00 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. या शाळांना १४ व्या वित्त आयोगातून सोलार पॅनल देता येणार आहे.