खोडमाशीपासून सोयाबीन जपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:06 AM2018-06-15T00:06:45+5:302018-06-15T00:06:45+5:30
मराठवाड्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून गतवर्षी चक्रीभुंगा व खोडमाशीने या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यंदा सुरुवातीपासूनच कीड व्यवस्थापन करण्याचे उपाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुचविले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मराठवाड्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून गतवर्षी चक्रीभुंगा व खोडमाशीने या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यंदा सुरुवातीपासूनच कीड व्यवस्थापन करण्याचे उपाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुचविले आहेत.
जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र सव्वा दोन लाख हेक्टरच्या आसपास असते. या पिकाची उगवण झाल्यावर लगेच खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर बीजदल पोखरते. नंतर ती मुख्य खोडामध्ये शिरते. त्यामुळे अशी रोपे कोमेजतात व वाळून जातात. पीक मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. तर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत आढळतो. अळी पानाचे देठ, खोड पोखरून आत शिरते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त भाग सुकून जातो. या दोन्हींचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. तर किडी खोडामध्ये राहात असल्याने व्यवस्थापन करणे अवघड जाते. त्यामुळे आता पेरणीपासूनच काळजी घेणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यात शेतातील काडीकचरा वेचून नष्ट करावा. सोयाबीन पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपायला हवी. सुरवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवायला हवे. प्रादुर्भावग्रस्त पाने, फांद्या आतील किडीसह नष्ट कराव्यात, पेरणी करताना जमिनीमध्ये फोरेट १0 टक्के सीजी हे १0 किलो प्रतिहेक्टर याप्रमाणे जमिनीत मिसळावे, किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ट्रायझोफॉस ४0 ईसी १२ मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली याची फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक व्ही.डी. लोखंडे यांनी केले आहे.