सभापती अविश्वासाच्या आता पडद्यामागूनच हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:35+5:302021-06-06T04:22:35+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समिती सभापती रत्नमाला चव्हाण यांच्याविरोधात माजी शिक्षण सभापती संजय देशमुख यांच्यासह ४३ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समिती सभापती रत्नमाला चव्हाण यांच्याविरोधात माजी शिक्षण सभापती संजय देशमुख यांच्यासह ४३ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यानंतर या प्रकरणात काही घडामोडी घडून सभापतींना अभय मिळेल, यासाठी प्रयत्न चालले होते; मात्र ते तोकडे पडले. शिवाय बहुतांश सदस्यांनी अविश्वासाच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्याने आगामी काळात जि. प. मध्ये आपली अडचण होऊ बसेल, या भीतीने आता कोणीही मागे हटायला तयार नाही. सुरुवातीचे चार ते पाच दिवस चव्हाणसमर्थक काही सदस्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यातून काहीच निष्पन्न होणार नसल्याचे दिसत असल्याने त्यातील काहींनी नांगी टाकली, तर काहीजण आजही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सांगत आहेत. मात्र अविश्वासापासून बचावासाठी हे संख्याबळ पुरेसे नाही. आता अवघ्या तीन दिवसांनी अविश्वासाची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात होणार आहे. त्यातच चव्हाण यांचे भवितव्य ठरणार आहे. त्यासाठी एवढ्या काळात त्यांना शिक्षण सभापतीपद मिळविण्यासाठी जशी जादू केली, ती करण्याची संधी आहे. यात त्या कितपत यशस्वी ठरतील, हे काळच सांगणार आहे.
जि.प.तील वाद मिटतील?
मागच्यापेक्षा यावेळी पदाधिकाऱ्यांतच वाद होण्याचे प्रमाण जास्त आहे. एका विभागाचे काम दुसऱ्याने अडविले, दुसऱ्याचे तिसऱ्याने अडविले, असे प्रकार घडत आहेत. हा हस्तक्षेप यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी कधी केला नाही. यावेळी ते चित्र असल्याने वाद वाढत आहेत. त्यामुळेच अविश्वासासारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे नंतरही हे वाद मिटतील का? हाच खरा प्रश्न आहे.
...तर नवा भिडू कोण?
यापूर्वीही चव्हाण यांच्यावर अविश्वास आणून कुणाला तरी पदावर बसविण्यासाठी जोरदार तयारी झाली होती. मात्र ती चर्चेतच विरली. यावेळी या अविश्वासामागे अनेकांचा हात आहे. मात्र अविश्वास पारित झाला, तर सभापती कोण? यावर अजूनही चर्चा नाही. पुढचे सात ते आठ महिनेच उरल्याने कोणी इच्छुक नाही की, अविश्वासावरच शंका? हे कळायला मार्ग नाही.