हिंगोलीत पोलिसांची विशेष मोहीम; १८ वारंटमधील आरोपींना न्यायालयासमोर केले हजर
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: October 4, 2023 04:38 PM2023-10-04T16:38:12+5:302023-10-04T16:38:37+5:30
वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर न राहणाऱ्या आरोपीविरूद्ध न्यायालयाकडून अजामीनपात्र व जामीनपात्र वारंट काढण्यात येतात.
हिंगोली : न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर न राहणाऱ्या १७ अटक वारंट व एका पोटगी वारंटमधील आरोपींना पकडून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात ४ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली.
गुन्ह्यांना आळा बसावा तसेच गुन्हेगारांवर वचक रहावा, यासाठी विशेष कोंबिंग ऑपरेशन व प्रतिबंधात्मक कार्यवाहीची मोहीम राबवली जात आहे. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, साक्षीदार व आरोपी हे वेळेवर समन्स व वॉरंटनुसार हजर व्हावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर न राहणाऱ्या आरोपीविरूद्ध न्यायालयाकडून अजामीनपात्र व जामीनपात्र वारंट काढण्यात येतात. या वारंटची बजावणीची विशेष मोहीमही राबविण्यात येत आहे.
त्यानुसार पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अजामीनपात्र, जामीनपात्र वारंट, पोटगी वारंट बाबत ४ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. या वेळी न्यायालयाकडून अनेक वेळा समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर न राहणारे १७ जणांना तसेच एका पोटगी वारंटमधील व्यक्तीस पकडून पोलिसांनी त्यांना न्यायालयासमक्ष हजर केले. या मोहीमेत वारंटची बजावणीही करण्यात आली.