भरधाव कारने उड्डाणपुलावर दोन दुचाकींना पाठीमागून उडवले; पाच जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 06:49 PM2024-06-13T18:49:14+5:302024-06-13T18:49:47+5:30
नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा पाटीजवळ उड्डाणपुलावर घडला अपघात
आखाडा बाळापूर ( हिंगोली ): नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा शिवारात उड्डाणपुलावर आज दुपारी साडेतीन वाजता दोन दुचाकींना पाठीमागून एका भरधाव कारने उडवले. यात दुचाकी वरील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एक गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
कळमनुरीकडून आखाडा बाळापुरकडे पाच जण दोन दुचाकीवर प्रवास करत होते. साळवा शिवारात भरधाव कारने (MH -14 GN-4225) समोरील दोन दुचाकींना ( क्र. MH-38 L-6830 व क्र. MH-38 AA-8853 ) उडवले. यात अजय मधुकर पाईकराव (वय 35वर्ष), शिवराज पांडुरंग पाईकराव ( वय 33वर्ष), सुनील चंपतराव धुळे ( वय 30 वर्षे, सर्व राहणार कान्हेगाव ता.कळमनुरी जिल्हा हिंगोली ) आणि प्रेमानंद सुदामराव वैद्य( वय 45), दिपाली प्रेमानंद वैद्य (वय 15 वर्षे, राहणार हिंगोली तालुका जिल्हा हिंगोली ) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
महामार्ग पोलीस तातडीने मदतीला धावले...
अपघाताची माहिती कळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक उमर शेख , जमादार थिटे, गजानन आगलावे यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले .जखमींना उपचारासाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले. या अपघाताची बाळापूर पोलिसांना मात्र खबरही नव्हती.