विनाक्रमांकांच्या भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू
By प्रसाद आर्वीकर | Updated: February 6, 2025 14:18 IST2025-02-06T14:17:39+5:302025-02-06T14:18:35+5:30
शोरुममधून निघालेल्या या स्कूल बसचे रजिस्ट्रेशनही झालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विनाक्रमांकांच्या भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू
हिंगोली : भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कूल बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सेनगाव- रिसोड रस्त्यावर घडली आाहे.
सेनगाव ते रिसोड या रस्त्यावर बुधवारी एक स्कूल बस जात होती. शोरुममधून निघालेल्या या स्कूल बसचे रजिस्ट्रेशनही झालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कौठा पाटीजवळ या स्कूलबसची आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात जखमी झालेले उत्तमसिंग राजी भगत (६०, रा.कोळसा ता.सेनगाव) यांना तातडीने सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले जात होते. मात्र दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरे जखमी शेख आरेफ शेख युसूफ (३८. रा.कोळसा, ता.सेनगाव) हे हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अपघातातील स्कूल बसही नुकतीच शोरुममधून बाहेर काढण्यात आली असावी. या बसला रजिस्ट्रेशन क्रमांकही नव्हता. ही बस जप्त करुन पोलिस ठाण्यात जमा केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.