औंढा तालुक्यातील मतदान केंद्रांकडे पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:24 AM2021-01-15T04:24:57+5:302021-01-15T04:24:57+5:30
औंढा नागनाथ : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तसेच १७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ग्रामपंचायतींसाठी ...
औंढा नागनाथ : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तसेच १७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदान केंद्राध्यक्ष, कर्मचारी हे या निवडणुकीच्या साहित्यासह मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत.
औंढा नागनाथ तहसीलच्या प्रांगणामध्ये निवडणूक निरीक्षक संतोषी देवकुळे, निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डाॅ. कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राध्यक्ष मतदान केंद्राकडे रवाना झाले. यावेळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, नायब तहसीलदार सचिन जोशी, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, मंडल अधिकारी एस. पी. घुगे आदी उपस्थित हाेते.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २१४ मतदान बुथ असून, १,२०० कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच राखीव कर्मचारी ७० तर २२ झोनल अधिकारी असून, ४६ वाहनांतून कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी दिली.
डीवायएसपी विवेकानंद वाखोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुंडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये डीवायएसपी १, पोलीस निरीक्षक २, पोलीस उपनिरीक्षक ४ तर १२२ पोलीस कर्मचारी व होमगार्ड नियुक्त केले आहेत. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.