हिंगोलीत एसटी सेवा बंद; आगारात येऊन २ बस पेटवण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
By रमेश वाबळे | Published: October 30, 2023 06:34 PM2023-10-30T18:34:03+5:302023-10-30T18:34:13+5:30
एसटी महामंडळाने सावध पवित्रा घेतला असताना दुपारी ४ च्या सुमारास आगारात उभ्या करण्यात आलेल्या बसेसपैकी दोन बस पेटवून देण्यात आल्याची घटना घडली.
हिंगोली :मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बससेवा बंद केली असून, आगारात एसटी बसेस उभ्या केल्या आहेत. परंतु, ३० ऑक्टोबर रोजी अज्ञातांनी आगारातील उभ्या असलेल्या बसेस पैकी दोन बस पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आल्याने नुकसान टळले.
मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा जिल्हाभरात पेटला असून गावोगावी आमरण, साखळी उपोषण, रास्ता रोको आंदोलने करण्यात येत आहेत. आंदोलनाची धग वाढत असल्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ पासून एसटी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशीही ३० ऑक्टोबर रोजी दिवसभरात एकही बस आगाराबाहेर जाऊ देण्यात आली नाही. एसटी महामंडळाने सावध पवित्रा घेतला असताना दुपारी ४ च्या सुमारास आगारात उभ्या करण्यात आलेल्या बसेसपैकी दोन बस पेटवून देण्यात आल्याची घटना घडली.
एमएच ०९ ईएम २२६३ ही शिवशाही व एमएच ०६ एस ८६४५ ही मानव विकास मिशन असलेल्या बसच्या चालकाच्या केबिनमध्ये अज्ञातांनी पेट्रोल ओतून पेटवून दिले. हा प्रकार आगारात उपस्थित चालक, वाहक व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे नुकसान टळले. परंतु, एका कर्मचाऱ्याचा हात भाजला आहे.घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी भेट देऊन माहिती घेत सूचना केल्या. यावेळी आगार प्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ. एम. शेख, मुकेश ठोंबरे आदींची उपस्थिती होती.