ST Strike : हिंगोलीत एसटी चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 04:15 PM2018-06-09T16:15:23+5:302018-06-09T16:15:23+5:30
कर्तव्य बजावून आलेल्या एसटी चालकाचा मृत्यू झाल्याने बसस्थानकात एकच गोंधळ झाला.
हिंगोली : वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळचे कर्मचारी संपावर आहेत. हिंगोली आगारातील काही कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. मात्र ९ जून रोजी कर्तव्य बजावून आलेल्या एसटी चालकाचा मृत्यू झाल्याने बसस्थानकात एकच गोंधळ झाला. या घटनेमुळे स्थानक परीसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
हिंगोली आगारातील चालक भास्कर प्रल्हाद अवचार (४५) रा. किनखेडा जि. वाशिम हे कर्तव्य बजावून हिंगोली येथील नातेवाईकांकडे जात होते. दुचाकीवरून जाताना अचानक त्यांच्या प्रकृतित बिघाड झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी अवचार हे मयत झाल्याचे सांगितले.
चालक अवचार यांच्या अचानक मृत्यू झाल्याने मात्र हिंगोली आगारात एकच गोंधळ उडाला. काही संघटनेच्या पदाधिकाºयांनी तर अवचार यांना डबलड्युटीवर पाठविले जात होते, या तणावातूनच मृत्यू झाल्याचा आरोप केला. तर आगारप्रमुख बी. बी. झरीकर म्हणाले भास्कर अवचार यांनी कर्तव्य बजावून बस डेपोत जमा केली. हिंगोली येथे त्यांचे नातेवाईक आहेत, नातेवाईकांच्या घरी जात असताना त्यांच्या प्रकृतित बिघाड झाला होता. हिंगोली आगारातील कर्मचा-याच्या मृत्यूची अद्याप ठाण्यात कोणी तक्रार दिली नाही. त्यामुळे वरील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल नाही. असे हिंगोली शहर ठाण्याचे पोनि उदयसिंग चंदेल म्हणाले.