स्वच्छता विभागाच्या हातामध्ये अग्निशमनचे स्टेरिंग, फायरमनचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:34 AM2021-03-01T04:34:06+5:302021-03-01T04:34:06+5:30
२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या एक ते सव्वा लाखाच्या जवळपास आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी यासाठी सद्यस्थितीत कार्यरत आहेत. ...
२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या एक ते सव्वा लाखाच्या जवळपास आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी यासाठी सद्यस्थितीत कार्यरत आहेत. हिंगोली जिल्हा झाल्यापासून केवळ अनुभवावर ते अग्निशमन विभागाचा कारभार पाहत आहेत. मुख्याधिकारी यांच्यामार्फत शासनदरबारी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. अग्निशमन विभागात अग्निशमन अधिकारी १ पद, लिडिंग फायरमन १ पद, फायरमन ४ पदे सध्या रिक्त आहे. दुसरीकडे स्थानक अधिकारी, सहायक स्थानक अधिकारी, पर्यवेक्षक, वाहनचालक ही पदे तर मंजूरच नाहीत. स्वच्छता निरीक्षक सध्या अग्निशमन विभागाचा कारभार चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. शासनाने मंजूर रिक्त पदे भरणे सध्या गरजेचे आहे.
बॉक्स
सर्वच कर्मचारी अप्रशिक्षित
हिंगोली शहरातील अग्निशमन विभागाकडे स्वच्छता विभाग व इतर विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत, पण हे सर्वच कर्मचारी अप्रशिक्षित आहेत. केवळ त्यांच्या मागे त्यांचा अनुभव आहे. अनुभवावरच ते आजमितीस अग्निशमन विभागाचा कारभार सुस्थितीत सांभाळत आहेत. शासन दरबारी प्रशिक्षित कर्मचारी देण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. परंतु, अजून तरी मागणीचा विचार केला गेला नाही. घटना कधी सांगून येत नसल्याने प्रशिक्षितांचा विचार होणे गरजेचे आहे.
बॉक्स
निधी नसल्याने अडचणी
अग्निशमन विभागाला निधी म्हणावा तेवढा मिळत नाही. यासाठी वारंवार मुख्याधिकारी यांच्यामार्फत कळविण्यातही आले आहे. निधी नसल्याने सद्यस्थितीत अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ अग्निशमन विभागावर येऊन ठेपली आहे.
प्रतिक्रिया
गेल्या अनेक वर्षांपासून नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक हे अग्निशमन विभागाचा कारभार पाहत आहेत. अग्निशमन विभागातील मंजूर पदे भरावीत, यासाठी मुख्याधिकाऱ्यांमार्फत शासन दरबारी पत्रव्यवहार केला आहे. सध्या या विभागाला दोनच वाहने आहेत. वाहनासाठीही शासन दरबारी कळविले आहे. सध्या चालक ४, फायरमन ७, अग्निशमन अधिकारी १ असे १२ कर्मचारी काम पाहत आहेत. हे कर्मचारी नगर परिषद स्वच्छता विभाग व इतर विभागांतील असून, चांगले काम करत आहेत.
-विश्वास ऊर्फ बाळू बांगर, प्र. अग्निशमन अधिकारी, हिंगोली