ज्यांना गावबंदी केली होती त्यांच्यासाठी आता पायघड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:55+5:302021-01-08T05:38:55+5:30
वसमत: कोरोना कालावधीत पुणे, मुंबईहून गावात परतणाऱ्यांना गावात येवू न देता गाबाबाहेर राहण्यासाठी भाग पाडले. अशांना आता मतदानासाठी ...
वसमत: कोरोना कालावधीत पुणे, मुंबईहून गावात परतणाऱ्यांना गावात येवू न देता गाबाबाहेर राहण्यासाठी भाग पाडले. अशांना आता मतदानासाठी सन्मानाने बोलावण्याची वेळ आली आहे. कोरोना कालावधीत केलेल्या चांगल्या-वाईट कामाचाही हिशोब देण्याची वेळ ग्रामपंचायत निवडणुकीत आली आहे. जुने वाद उकरुन काढणे, जुन्या भांडणाचा वचपा काढणे, रुसवे-फुगवे, नफा-नुकसान याचा हिशोब देण्याची जागा म्हणजे निवडणूक. त्यातल्या त्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तर पिढ्यांचा वादही उफाळून येवू शकतो. आता कोरोना कालावधीतही निवडणुकीवर प्रभाव टाकत असल्याचे चित्र समोर येत आहे. निवडणुकीसाठी एक-एक मतदान महत्त्वाचे ठरणार असल्याने बाहेरगावी गेलेल्यांचा संपर्क सुरू झाला आहे. मतदानाच्या दिवशी येवून जा असे निरोप पाठविले जात आहेत. मात्र, नोकरी,धंद्यानिमित बाहेरगावाहून येणाऱ्यांना कोरोना कालावधीत गावात येवू नका, असा निरोप देणारेही आता मतदानाला येवून जा म्हणून विनवण्या करू लागले आहेत.
पुणे, मुंबईहून आलेल्या आपल्याच गावातील रहिवाशांना गावबंदी, गावाबाहेर राहण्याची सक्ती करण्यापर्यंत मजल गेली होती. होम क्वारंटाईन झालेल्यांना तर घराबाहेर दिसले तरी सुनावले जात होते. आता या प्रकाराने दुखावलेले मतदार वचपा काढण्याच्या तयारीत असल्याने उमेदवार धास्तावले आहेत. ‘तो मी नव्हेच’ म्हणत विरोधी पॅनलप्रमुखांवर खापर फोडण्याचे प्रकारही घडत आहेत. तंबाखूसाठी जादा पैसे वसूल करुन आता निवडणुकीनिमित्ताने उभे राहणाऱ्यांना फटका बसत आहे. दहा रुपयांची पुडी शंभर रुपयाला विकून गरजवंताना लुटण्याबद्दल पश्चाताप करण्याची वेळही काही ‘दुकानदार’ उमेदवारावर आली आहे. कोरोना कालावधीत जादा दराने वस्तू विकणारे चोरून दारू विकून पैसा कमावणारे, व्याजबट्टा करणारावरील रागही या निवडणुकीत व्यक्त होण्याची चिन्हे असल्याने आजवर दुखावलेल्यांना ‘खूश’ करण्यासाठी पायघड्या घालण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. कोरोना कालावधीत समाजसेवेच्या नावावर चमकोगिरी करणारे व चमकी समाजसेवकही रोषाचे धनी ठरत आहेत. कोरोना कालावधीत ज्यांनी समाजसेवा केली त्यांच्याबद्दल सहानुभूतीसाठी व्यक्त होताना दिसत आहे. एकंदरीत मागील काळातील ‘कमी’ चा हिशोब देण्याची वेळ आल्याने संधीसाधू उमेदवारात चिंतेचे वातावरण आहे.