अजूनही ८३८ घरकुले अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:45 AM2019-09-11T00:45:41+5:302019-09-11T00:46:00+5:30
मागील तीन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५१८३ मंजूर घरकुलांपैकी ८३८ घरकुलांचे काम रखडलेलेच आहे. तर रमाई योजनेत हे प्रमाण जास्त असून यात ५७६६ पैकी ३0८३ घरकुलांचे काम ठप्प आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील तीन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५१८३ मंजूर घरकुलांपैकी ८३८ घरकुलांचे काम रखडलेलेच आहे. तर रमाई योजनेत हे प्रमाण जास्त असून यात ५७६६ पैकी ३0८३ घरकुलांचे काम ठप्प आहे.
पंतप्रधान आवास योजनेत २0१६ ते २0१९ या काळात ५१८३ घरकुलांचे उद्दिष्ट होते. औंढा नागनाथ ८५२, वसमत १११३, हिंगोली ७६३, कळमनुरी १३२३, सेनगाव ११३२ असे उद्दिष्ट आहे. नवीन उद्दिष्टासह १0४५५ घरकुलांसाठी लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. यापैकी ५३९७ जणांना पहिल्या हप्त्याचे वितरण झाले आहे. यापैकी ४४५५ जणांना दुसरा हप्ता दिला आहे. तर ४२१३ जणांना तिसरा हप्ता दिला आहे. २१४८ जणांना चौथाही हप्ता दिला आहे. या कामांपैकी मात्र एकूण ४३४५ कामे पूर्ण झाली आहेत. तर ८३८ कामे अजूनही अपूर्ण आहेत. यामध्ये औंढा ११४, वसमत २८९, हिंगोली ९१, कळमनुरी १४७, सेनगाव १९७ अशी संख्या आहे.
रमाई घरकुल योजनेत तर वेगळेच चित्र आहे. २0१६-१९ या कालावधीत एकूण ५७६६ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. यामध्ये औंढा ७२९, वसमत ११0९, हिंगोली १२७६, कळमनुरी १४४१, सेनगाव १२११ अशी संख्या आहे. यातील ४५६७ घरकुल लाभार्थ्यांची खातेक्रमांकासह पडताळणी झाली होती. यापैकी ४३२३ खात्यांवर पहिला हप्ता तर १0६६ जणांना चौथा हप्ता मिळाला आहे. यापैकी २६८३ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर अद्यापही ३0८३ घरकुलांचे काम रखडलेले आहे. यात औंढा ४८३, वसमत ४९६, हिंगोली ६९१, कळमनुरी ७१८, सेनगाव ६९५ अशी संख्या आहे. प्रधानमंत्री आवासपेक्षा यात रखडलेली कामे जास्त आहेत.