अजूनही दावे-प्रतिदावेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:26 PM2019-01-15T23:26:08+5:302019-01-15T23:26:31+5:30
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला १0 तर भाजप-शिवसेना युतीला ८ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही युतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जात असून आता यात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळेही सभापती युतीचाच होणार असल्याचे म्हणू लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला १0 तर भाजप-शिवसेना युतीला ८ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही युतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जात असून आता यात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळेही सभापती युतीचाच होणार असल्याचे म्हणू लागले आहेत.
तसे या निवडणुकीपासून आ.मुटकुळे दूरच राहिल्याचे चित्र होते. त्यांनी या रणांगणात थेट न उतरता बाहेरूनच आढावा घेतला. याचप्रमाणे खा.राजीव सातव यांनीही शिलेदारांच्या खांद्यावर धुरा सोपवून शेवटच्या टप्प्यात काही गावांचा दौरा तेवढा केला. मात्र आता खा.सातव सक्रिय झाले आहेत. विरोधकांच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी पक्षीय मंडळीला सावध राहण्याचा सल्ला दिला. तसेच निवडणुकीप्रमाणे आता निवडीची बैठक हलक्याने घेऊ नका. यात गांभिर्याने सामोरे जाण्यास सांगितले. दुसरीकडे आ.मुटकुळे यांनीही बाजार समितीत युतीचाच सभापती होणार असल्याचे छातीठोकपणे सांगत वेगळाच रंग भरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे काँग्रेस-राकाँने बहुतांश जणांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारीही केली. काहींना तर हलविलेही आहे. या निवडणुकीत भाजपचे खा.शिवाजी माने यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची राहणार आहे. पुतणे दत्ता माने यांच्यासाठी त्यांचा फोडाफोडीचा प्रयत्न राहणार आहे. मात्र काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी मुलगा दत्ता बोंढारे यांच्यासाठी टाईट फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजपकडून माजी आ.गजानन घुगे यांनी तर सेनेकडून जिल्हाप्रमुख संतोष बांगर, राजेंद्र शिखरे आदींनी रणनीती आखली होती. राकाँचे आ.रामराव वडकुते, मनीष आखरे, कदम आदींनी मेहनत घेतली. मात्र या सर्वच पक्षांना अंतर्गत गटबाजीत काही जागा गमवाव्या लागल्या. तर काही अनपेक्षित मिळाल्या.
निवडणुकीपूर्वीच्या समीकरणांपेक्षा नंतरची समीकरणे जुळविणे युतीला अवघड जाणार आहे. जसा युतीच्या नेत्यांना आपल्याच पक्षाच्या लोकांनी धोका दिला. त्यापेक्षा जास्त आघाडीच्या मुळावर ही बाब उठली. आगामी निवडणुकांची ही नांदी असल्याचे चित्र आहे. जो-तो पोखरायला निघाला असला तरीही आघाडीला वर्चस्व राखता आले, हेही तेवढेच खरे. मात्र यामुळे सावध होण्यास वेळही मिळाला असून आगामी काळात याचे राजकीय पडसाद दिसल्यास नवल नाही. सगळेच आलबेल नसल्याचे चित्रही यामुळे समोर आले.
या निवडणुकीत सभापती निवडीचा कार्यक्रमही अजून जाहीर झाला नाही. तरीही एकमेकांवर नजर ठेवणे सुरू आहे. तर आतापासून संचालक सहलीवर पाठवणेही खर्चिक ठरणार आहे.