नांदेड आगाराच्या बसवर हिंगोलीनजीक दगडफेक;
By रमेश वाबळे | Published: November 24, 2023 10:43 PM2023-11-24T22:43:01+5:302023-11-24T22:43:16+5:30
शेगावहून नांदेडकडे निघालेल्या बसवर हिंगोली शहरा नजीक दगडफेक झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली.
हिंगोली : शेगावहून नांदेडकडे निघालेल्या बसवर हिंगोली शहरा नजीक दगडफेक झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना दुखापत झाली नसली तरी बसच्या पाठीमागील काच फुटल्याने १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
नांदेड आगाराची एम.एच.०६ एस ८७३५ क्रमांकाची बस शेगावहून हिंगोलीमार्गे नांदेडकडे जात होती. या बसवर रात्री ८ च्या सुमारास हिंगोली शहरा नजीक नर्सी फाट्याजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी पाठीमागून दगडफेक केली. काच फुटून दगड आतमध्ये आल्याने जोरात आवाज झाला. त्यावेळी प्रवाशांत एकच गोंधळ उडाला होता.
सुदैवाने या घटनेत प्रवाशांना दुखापत झाली नसली तरी या घटनेत जवळपास १२ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर ही बस चालक बाळासाहेब उत्तमराव पाटील व वाहक गजानन अंबादासराव देसाई यांनी हिंगोली बसस्थानकात आणली व प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करण्यात आले. या ठिकाणी आगारप्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ.एम. शेख यांनी बसची पाहणी केली. घटनेप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.