जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांऱ्यांकडून दगडफेक; बचावासाठी पोलिसांनी केली फायरिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 12:34 PM2022-12-10T12:34:44+5:302022-12-10T12:35:10+5:30

पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पीकअप पकडला

Stone pelting by illegal cow traffickers; The police fired in defense | जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांऱ्यांकडून दगडफेक; बचावासाठी पोलिसांनी केली फायरिंग

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांऱ्यांकडून दगडफेक; बचावासाठी पोलिसांनी केली फायरिंग

Next

- इस्माईल जाहगीरदार
वसमत :
 गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने शहरातील पोलिस वसाहतीसमोरून जाणाऱ्या संशयास्पद पीकअपला थांबण्याचा इशारा केला असता त्यातील व्यक्तींनी पोलिसांवरच दगडफेक केली. त्यावेळी बचावासाठी पोलिसांनाही फायरिंग करावी लागल्याची घटना १० डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

वसमत शहर पोलिस ठाण्याचे फौजदार बाबासाहेब खार्डे,जमादार दिलीप पोले यांच्यासह पोलिस पथक ९ डिसेंबर रोजी रात्रीला गस्तीवर होते. या पथकाला शनिवारी पहाटे ४.३० सुमारास  वसमत शहरातील पोलिस वसाहतीजवळ  एक पीकअप ( एम.एच.२६ बी ०५३४ ) निदर्शनास आले. त्यांनी पीकअप थांबविण्याचा इशारा केला असता पिकअप मधील चार ते पाच जणांनी पोलीसांवर दगडफेक केली. 

यादरम्यान बचावासाठी पोलीसांनी फायरिंग करताच चालकाने पीकअप भरधाव वेगात पुढे नेला. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी या पीकअपचा पाठलाग करणे सुरू केले. सुमारे १५ ते २० कि.मी. पीकअपचा पाठलाग करण्यात आला. भरधाव वेगातील पीकअप नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव शिवारात उलटले. पीकअप उलटताच अंधाराचा फायदा घेवून आतील व्यक्ती पसार होण्यात यशस्वी झाले. त्यानंतर पोलिसांनी पीकअपची तपासणी केली असता आतमध्ये पाच गायी कोंबून नेण्यात येत होत्या. त्या गायींची पोलिसांनी सुटका करून गोशाळेत पाठविल्या. तर पीकअप पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दगडफेकीत पो कॉ शिवाजी पतंगे जखमी झाले आहेत. घटनास्थळी हिंगोलीचे अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. 

Web Title: Stone pelting by illegal cow traffickers; The police fired in defense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.