हिंगोली आगाराच्या बसवर दगडफेक; चालकाच्या छातीवर लागला दगड, बसचे मोठे नुकसान

By रमेश वाबळे | Published: September 2, 2023 11:47 AM2023-09-02T11:47:54+5:302023-09-02T11:48:39+5:30

परभणीजवळील खानापूर फाटा येथे दगडफेक, बसची काच फुटल्याने नुकसान

Stone pelting on bus of Hingoli depo near Parabhani; A stone hit the driver's chest, causing major damage to the bus | हिंगोली आगाराच्या बसवर दगडफेक; चालकाच्या छातीवर लागला दगड, बसचे मोठे नुकसान

हिंगोली आगाराच्या बसवर दगडफेक; चालकाच्या छातीवर लागला दगड, बसचे मोठे नुकसान

googlenewsNext

हिंगोली : येथील एसटी आगाराच्या बसवर परभणीजवळील खानापूर फाटा येथे अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी रात्री १०:१५ च्या सुमारास घडली. या घटनेत चालकाच्या छातीला दगड लागल्यामुळे किरकोळ दुखापत झाली आहे तर बसचा समोरील काच आणि दोन खिडक्या फुटल्याने नुकसान झाले.

हिंगोली आगाराची एम.एच.०६ एस ८५१९ ही बस १ सप्टेंबर रोजी हिंगोलीहून परभणीला गेली होती. परभणीहून परत येताना रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास खानापूर फाटानजीक अज्ञातांनी बसवर दगडफेक केली. एक दगड चालक रमेश देशमुख यांच्या छातीला लागला. तर समोरील काचेवरही दगडफेक करण्यात आल्यामुळे काच फुटली असून, दोन खिडक्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना दुखापत झाली नाही. दगडफेकीच्या घटनेनंतर चालक रमेश देशमुख व वाहक पुंडगे यांनी बस परत परभणी बस आगारात नेली. ही बस दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबर रोजीही त्याच ठिकाणी होती.

जिल्ह्यातील तीन आगाराच्या ८७ बसफेऱ्या रद्द...
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाची शक्यता लक्षात घेता हिंगोली, वसमत व कळमनुरी आगाराच्या वतीने २ सप्टेंबर रोजी पहाटेपासूनच्या बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. सकाळी ११  वाजेपर्यंत हिंगोली आगाराच्या ३० फेऱ्या रद्द झाल्या. तर वसमत आगारातंर्गत ३२ फेऱ्या रद्द झाल्या असून, कळमनुरी येथील २५ फेऱ्या रद्द झाल्या आहेत. बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याने एसटी महामंडळाला मोठा फटका बसत आहे. 

प्रवाशांची तारांबळ...
बसफेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. हिंगोलीसह वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ येथील बसस्थानकात प्रवासी थांबले आहेत. परंतु, आज बस फेऱ्या सुरू होण्याची शक्यता नसल्याचे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात असल्याने काही प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. तर काहीजण बस सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असल्याचे हिंगोली बसस्थानकात पहावयास मिळाले.

Web Title: Stone pelting on bus of Hingoli depo near Parabhani; A stone hit the driver's chest, causing major damage to the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.