औंढ्यात कावड यात्रेवर दगड मारल्याने दोन गट आपसात भिडले;परिस्थिती नियंत्रणात, वाद मिटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:49 PM2022-08-22T19:49:03+5:302022-08-22T19:49:28+5:30
तुंबळ हाणामारीत अनेक शिवभक्त जखमी झाले, काही वेळाने मिटला वाद
औंढा नागनाथ: वसमत तालुक्यातील गुंडा येथून मंदिराच्या उत्तर गेटवर आलेल्या कावड यात्रेवर दगड मारल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नागनाथ मंदिर परिसरात घडली. या घटनेमुळे गावामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींची धरपकड सुरू केली आहे. शहरात अतिरिक्त पोलीस अधीक्षक दाखल झाले असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या शहरात शांतता आहे.
औंढा नागनाथ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या ज्योतिर्लिंग असल्याने या ठिकाणी शिवभक्त मोठ्या प्रमाणात कावड यात्रा घेऊन येतात. वसमत तालुक्यातील गुंडा येथील कावड यात्रा दुपारी तीन वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरून नागनाथ मंदिराकडे येत होती. दरम्यान, कावड यात्रेतील डीजेच्या तालावर नाचणाऱ्या टोळक्यामध्ये अज्ञाताने दगड मारला. यामुळे कावडमधील शिवभक्त संतप्त झाले. त्यांनी दिसेल त्याला चोप दिल्याने मोठा वाद निर्माण झाला.
याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला. त्यानंतर नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना शांत केले. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख दाखल झाले असून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत आहेत. दरम्यान, सध्या तणाव निवळला असून गावकरी व कावड यात्रेमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात आला आहे.