हिंगोलीत दोन गटाच्या वादातून तुफान दगडफेक; तणावसदृश्य स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:01 PM2019-08-12T12:01:57+5:302019-08-12T12:21:00+5:30
जमावाने शहरातील दुकाने, वाहनांवर दगडफेक केल्याने मोठे झाले आहे
हिंगोली : शहरातील औंढा मार्गावर दोन गटांत वाद निर्माण झाल्यानंतर हजारोंच्या जमावाने शहरातील दुकाने, वाहनांवर दगडफेक केल्याने मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये दहशतिचे वातावरण आहे. शहरात संचारबंदीसदृश्य वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान दोन समाजाचे नियोजित कार्यक्रम त्यांच्या-त्यांच्या नियोजनप्रमाणे चालत होती. यासाठी जाणाऱ्या वाहनांवर अचानक दगडफेक झाली. कोणीतरी आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप होता. त्यानंतर जमावाने या भागातील शेकडो दुकाने व वाहनांवर दगडफेक केली. गांधी चौक ते जिल्हा कचेरीच्या कोपऱ्यापर्यंत, एनटीसी भागात अशी तोडफोड झाली. यात लाखोंचे नुकसान झाले. यात अनेकजण जखमीही झाले असून काहींना गंभीर दुखापत झालेली आहे.
पोलिसांना या दोन्ही कार्यक्रमांबाबत माहिती असताना त्यांनी पुरेसे नियोजन केले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. घटनेनंतर मात्र पोलिसांनी जागोजाग नाकेबंदी केली. या घटनेमुळे मात्र शहरात संचारबंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य रस्ते निर्जन दिसत असून ग्रामीण भागातून आलेली मंडळी गावाकडे परतत होती. तर शहरातील अनेक भागात दुकानेही बंद ठेवली होती. दरम्यान, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अति.पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतुल चोरमारे, सुधाकर रेड्डी आदींनी घटनास्थळी भेट दिली.
या घटनेनंतर कावड यात्रेलाही परवानगी नाकारली होती. मात्र संयोजक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शांततेत ही यात्रा काढण्याचे आश्वासन दिल्याने कावड यात्रेला परवानगी दिली. साडेअकराच्या सुमारास जत्थे पुन्हा कळमनुरीकडे रवाना झाले.