वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी औंढ्यात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:40 PM2019-09-19T23:40:05+5:302019-09-19T23:40:24+5:30
येथील जुन्या बसस्थानकाजवळ वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य रस्त्यावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथील जुन्या बसस्थानकाजवळ वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य रस्त्यावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
तालुक्यात सध्या खरिपाचा हंगाम बहरला आहे. परंतु वन्य प्राणी उभे पीक फस्त करून नासाडी करत पिकाचे मोठे नुकसान करत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर हे वन्यप्राणी हल्लेही करत आहेत. त्यामुळे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांनी जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकरी आता वन्यप्राण्यांमुळे त्रस्त झाला आहे. माळाकडची शेती या प्राण्यांनी फस्त केलेली आहे. त्यामुळे या शेतकºयांवर खरिपातील पिके गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. दलित, आदिवासी, बंजारा व इतर समाजातील लोकांच्या वहितीत असलेल्या शेतजमिनी वृक्षलागवडीच्या नावाखाली वन विभागाने ताब्यात घेणे थांबवावे, वन्य प्राण्यांपासून शेतकºयांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी शेतकºयांना शस्त्र वापरण्याची परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांना देण्यात आले. मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास गावा-गावात विभागाच्या विरोधात आंदोलन केले जातील, असा इशाराही जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांनी दिला.
यावेळी आयोजक रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख किरण घोंगडे, गोरख खिल्लारे, पंडित खिल्लारे, बाळासाहेब घनसावंत, रंगनाथ चव्हाण, भीमराव पानपट्टे, हनवता शिंदे, वामन चव्हाण, प्रकाश जाधव, सुनील खंदारे, माधव सोळंके, सुभाष सोळंके, विजय बलखंडे, यशवंत साळवे, कोंडाबाई पंडित, कलावतीबाई थोरात, सुधाकर मोगरे, करण वाघमारे, नितीन ढगे, हरिभाऊ चव्हाण, प्रमोद काचगुंडे, हनुमान काचगुंडे, भगवान खिलारे, मिलिंद घोंगडे आदींसह तालुक्यातील सिद्धेश्वर, गोळेगाव, सुरवाडी, अंजनवाडा, तळणी, सावंगी, ढेगज, वडचुना, दुरचूना, ब्राह्मणवाडा, सुकापूर, ढेगज गावातून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी पाहून अनेक राजकीय नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक राहुल तायडे, जमादार यशवंत गुरुपवार, जमादार अफसर पठाण, खिजर पाशा यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.