अवैध धंद्यांविरुद्ध रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:51 PM2018-01-01T23:51:20+5:302018-01-01T23:51:27+5:30
तालुक्यातील कोळसा येथे खंडोबा यात्रा सुरु झाली आहे. यात्रेपासून काही अंतरावर सापडगाव शिवारात लोक कलेच्या नावाखाली दाखल झालेले तमाशा मंडळ देहविक्री करीत असल्याने या विरोधात कोळसा येथील ग्रामस्थांनी सुकळी पाटी येथे १ जानेवारी रोजी रास्ता रोको केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील कोळसा येथे खंडोबा यात्रा सुरु झाली आहे. यात्रेपासून काही अंतरावर सापडगाव शिवारात लोक कलेच्या नावाखाली दाखल झालेले तमाशा मंडळ देहविक्री करीत असल्याने या विरोधात कोळसा येथील ग्रामस्थांनी सुकळी पाटी येथे १ जानेवारी रोजी रास्ता रोको केला.
कोळसा येथे पुरातन काळापासून यात्रा भरते, सदर यात्रेचे अनेक वर्षांपूर्वी सापडगाव शिवारातून कोळसा शिवारात स्थलांतर झाले होते. त्यामुळे या दोन गावात यात्रा भरण्यावरुन वाद सुरु आहेत. अशा स्थितीत मागील वीस वर्षांपासून कोळसा शिवारातील खंडोबा देवस्थानाजवळ यात्रा भरत आहे. परंतु यंदा यात्रा दोन ठिकाणी भरली असल्याने दोन्हीही गावात पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे.
दोन गावातील वादामुळे दोन्ही ठिकाणी म्हणावे तसी यात्रा यंदा भरलेली नाही. अशा स्थितीत सापडगाव शिवारात यात्रेत दाखल झालेले तमाशाचे फड बंद करावे तसेच या दोन यात्रेतील वादात सेनगाव पोलीस ठाण्याचे पोनि मधूकर कारेगावकर यांनी दुहेरी भूमिका घेतल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी या मागणीसाठी कोळसा येथील ग्रामस्थांनी सुकळी पाटी येथे सोमवारी सकाळी ९ ते २ या वेळात सेनगाव - रिसोड राज्य रस्त्यावर सहा तास रास्ता रोको केला.
यावेळी तहसीलदार वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन विविध मागण्याचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात काँग्रेसचे भास्करराव बेंगाळ, सरपंच नारायण बेंगाळ, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सूर्यभान ढेंगळे, तालुकाध्यक्ष अशोक ठेंगल, पुरुषोत्तम गडदे, अभिषक बेंगाळ, सय्यद लियाकत, ज्ञानेश्वर बेंगाळ, कैलास देवळे, परसराम पावडे, झनक बेंगाळ, जगन्नाथ वाव्हळ, रमेश तोंडे, वैजेनाथ तोंडे, काशीराम बेंगाळ, प्रल्हाद बोरकर, बबन गांजरे, राघोजी पावडे, भागवत वाव्हळ, विलास वाव्हळ आदी सहभागी झाले होते. आता आंदोलनानंतर तरी अवैध धंदे बंद होतात की नाही, याकडे लक्ष लागले आहे.