वीजप्रश्नी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:27 AM2018-11-15T00:27:40+5:302018-11-15T00:28:30+5:30
किरकोळ बिघाडाने औंढा तालुक्यातील तीन ३३ केव्ही केंद्र बंद पडल्यामुळे ३५ ते ४० गावे चार दिवसांपासून आंधारात असून महावितरण दखल घेत नसल्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने येळी फाटा येथे रास्तारोको करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : किरकोळ बिघाडाने औंढा तालुक्यातील तीन ३३ केव्ही केंद्र बंद पडल्यामुळे ३५ ते ४० गावे चार दिवसांपासून आंधारात असून महावितरण दखल घेत नसल्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने येळी फाटा येथे रास्तारोको करण्यात आला.
औंढा तालुक्यातील रामेश्वर, साळणा व सिद्धेश्वर येथील तीन ३३ केव्ही विद्युत केंद्रास जिंतूर येथून वीज वितरण केंद्रातून वीजपुरवठा केला जातो. जिंतूर येथून होणारा विद्युत पुरवठा क्षुल्लक बिघाड झाल्यामुळे बंद करण्यात आला होता. परिणामी, या ३३ केव्ही विद्युत केंद्रावर अवलंबून असणारी तालुक्यातील ३५ ते ४० गावे चार दिवसांपासून अंधारात आहेत. याकडे महावितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्यामुळे शिवसेनेने येळी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. या रास्ता रोकोमुळे जिंतूर-नांदेड-हिंगोली या राष्टÑीय महामार्गावर वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. औंढा येथील उप अभियंता जैन, नायब तहसीलदार बोथीकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तर तत्काळ दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे अश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, वीजपुरवठा किरकोळ कारणाने वारंवार खंडित होतो. त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करावा, भारनियमनाव्यतिरिक्त इतर वेळात वीजपुरवठा खंडित करु नये, जळालेले रोहित्र तत्काळ बदलून द्यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन केले. निवेदनावर ज्ञानेश्वर झटे, राजाभाऊ मुसळे, रामप्रसाद कदम, पांडुरंग नागरे, बबन ईघारे, नंदकुमार रवंदळे, श्यामसुंदर ईघारे, सुदाम वैद्य आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच भजन करून ठाण मांडलेले होते. आंदोलनादरम्यान औंढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि ठाकूर, पोउपनि राहुल तायडे यांनी बंदोबस्तास ठेवला.