हिंगोली-परभणी महामार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:40 AM2018-10-09T00:40:16+5:302018-10-09T00:40:38+5:30
वसमत तालुक्यातील हट्टा येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना दोन दिवसापुर्वी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ ८ आॅक्टोबर रोजी हिंगोली-परभणी राष्टÑीय महामार्गावरील हट्टा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हट्टा: वसमत तालुक्यातील हट्टा येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना दोन दिवसापुर्वी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ ८ आॅक्टोबर रोजी हिंगोली-परभणी राष्टÑीय महामार्गावरील हट्टा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
सोमवारी सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दिड तास आंदोलन सुरुच होते. आंदोलनादरम्यान हिंगोली-परभणी महामार्गावर १ कि.मी. अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदर घटने प्रकरणी ६ आॅक्टोबर रोजी अज्ञान व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखलही करण्यात आला आहे. आरोपीस तात्काळ करा अन्यथा रास्तारोको व गाव बंदचा इशाराही दिला होता. परंतु घटनेनंतर २४ तास उलटूनही पोलिसांनी कोणत्याच हालचाली न केल्याच्या निषेधार्थ संतप्त समाजबांधवांनी आंदोलन केले. आंदोलनात तरुण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंगोली-परभणी राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळण्यात आली. पोलिसांनी लवकरात लवकर तपास केला नाही, तर यानंतर तालुका व जिल्हा पातळीवर आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकांनी दिला. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद यांनी घटनेचा तपास तात्काळ करुन संबधित समाजकंटकावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बंदोबस्तासाठी हट्टा पोलीस ठाण्याचे सपोनी गुलाब बाचेवाड, पोउपनी मुलगीर, गणेश लेकुळे, पोलीस मुख्यालयातील मोठा फौजफाटा तैनात होता.