हिंगोलीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:12 AM2018-10-12T01:12:58+5:302018-10-12T01:13:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विविध कारणांनी मागील तीन ते चार दिवसांपासून मोंढ्यातील खरेदी सातत्याने बंद राहात असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज पीपल्स बँकेनजीक न.प.कॉम्प्लेक्ससमोर दुपारी दीडच्या सुमारास रास्ता रोको केला. पोलिसांनी मध्यस्थी करीत शेतकऱ्यांना मोंढ्यात नेले. त्यानंतर बाजार समिती प्रशासनाने माल खरेदीची घोषणा केली.
हिंगोलीतील मोंढ्यात तीन दिवसांपूर्वी मालाची छाननी करणारे माल नेत असल्याचा आरोप करून सुरक्षारक्षकाने अडविल्याने वाद झाला होता. हाणामारीही झाली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रकरण मिटले. काम सुरू झाले. मात्र पुन्हा ही तक्रार मागे घेण्याच्या मागणीसाठी हमालांनी काम बंद केले. शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेवून आले होते. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारानंतर दुपारी दीडच्या सुमारास शेतकऱ्यांचा संयम सुटला. काही शेतकºयांनी नेतृत्व करीत पीपल्स बँकेनजीक रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल हे सहकाऱ्यांसह दाखल झाले. समस्या काय आहे? याची त्यांनी विचारणा केली. तर शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘छन्न्यावाल्यांचे आंदोलन असल्याने व्यापारी माल खरेदी करीत नाहीत. मागील तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. एकतर याबाबत बाजार समितीने आधीच सांगायला पाहिजे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आमची अडचण होणार आहे. मुक्काम करावा लागणार आहे. मालही रस्त्यावर पडला आहे. शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या थप्प्या लावून ठेवलेल्या आहेत. एकतर आम्हाला पूर्वसूचना नाही. दुसरे म्हणजे येथे काहीच व्यवस्था नाही आणि आमचे म्हणने ऐकून घ्यायला बाजार समितीचे पदाधिकारी व प्रशासनही समोर येत नाही. मग रास्ता रोकोशिवाय पर्याय तरी काय आहे? मात्र बाजार समिती प्रशासनाशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन देत चंदेल यांनी सर्वांना मोंढ्यात नेले. त्यानंतर तेथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, राम कदम, राकाँचे बालाजी घुगे आदी दाखल झाले.
बांगर यांनी सभापतीशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. तर शेतकºयांच्या मालाची खरेदी लागलीच सुरू करण्याचा आदेश देण्यात येईल, असे सभापती हरिश्चंद्र शिंदे यांनी सांगितल्याचे शेतकºयांना सांगून आज रात्री उशिरापर्यंत काटे चालतील, असे सांगितले. त्यानंतर शेतकरी शांत झाले.
अन् मोंढा सुरळीत झाला
याबाबत बोलताना बाजार समितीचे व्यापारी संचालक माजी आ.गजानन घुगे म्हणाले, हमालांचा प्रश्न आम्ही बाजार समितीच्या सभेत मांडला होता. मात्र पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. आज हमालांशी मध्यस्थी करून हा प्रश्न सोडविला. आता सोयाबीन व हळदीची खरेदी सुरू झाली आहे. दुसरे संचालक प्रशांत सोनी म्हणाले, हमाल व सुरक्षा रक्षकांत हाणामारी झाली. यात छन्न्यावरील कामगाराला मार लागला, असे त्यांचे म्हणने आहे. तर सुरक्षा रक्षकाने ते माल चोरून नेत असल्याचे सांगितले. या वादात हमालांनी आज काम बंद केले.
याबाबत बाजार समितीचे सभापती हरिश्चंद्र शिंदे म्हणाले, हमालांच्या प्रश्नामुळे मोंढ्यात खरेदी बंद झाली होती. त्यांच्याशी बोलणी करून तोडगा काढला आहे. आता खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. उशिरापर्यंत सर्व माल खरेदी केला जाईल.