न.प.तील विषय समित्यांसाठी रणनीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:47 AM2018-02-06T00:47:36+5:302018-02-06T00:47:39+5:30
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विरोधक पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर न.प.तील विषय समित्यांची स्थापना करण्यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याच दालनात बैठक सुरू होती. बंद दाराआड यात चर्चा झाली. मात्र त्यात काय निष्पन्न झाले हे कळायला मार्ग नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विरोधक पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर न.प.तील विषय समित्यांची स्थापना करण्यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याच दालनात बैठक सुरू होती. बंद दाराआड यात चर्चा झाली. मात्र त्यात काय निष्पन्न झाले हे कळायला मार्ग नाही.
नगरपालिकेत एकूण सहा समित्या स्थापन करता येतात. यापैकी दोन समित्या तर अध्यक्ष व उपाध्यक्षांकडेच राहणार आहेत. उर्वरित चार समित्यांसाठी निवड प्रक्रिया राबवावी लागणार आहे. यात संख्याबळ उपयोगी पडणार की नाही, हा प्रश्नच असला तरीही या मनसुब्यांना सुरुंग लावण्यासाठी सायंकाळी उशिरा हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दोलायमान होण्याची भीती वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीचे सभागृहात सर्वाधिक १३ नगरसेवक आहेत. तर काँग्रेस-६, शिवसेना-६, भाजप-३, मनसे-२, एमआयएम-१, अपक्ष-१ असे इतर पक्षीयांचे संख्याबळ आहे. संख्याबळाचाच विचार केला तर राष्ट्रवादीकडे दोन, काँग्रेस व सेनेकडे प्रत्येकी एक सभापतीपद येवू शकते. त्यादृष्टिने हालचालीही सुरू आहेत.
न.प.त सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा मुद्दा मागील काही दिवसांपासून जोरदारपणे चर्चेत आला आहे. त्याला पुष्टी देण्यासाठीच आजच्या सभेतही विरोधकांनी एकत्र येत किल्ला लढविला. अवैध नळ जोडण्यांच्या दंडवसुलीचा मुद्दा चक्क सभागृहाच्या पटलावर आल्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्याचाच फायदा घेत विरोधी मंडळींचे बळ वाढले. उपनगराध्यक्षपद राकाँकडे असल्याने अर्धा सत्ताधारी असलेला हा पक्षही नाराजांनी भरलेला आहे. तर अनेक दिग्गजांचा भरणा असल्याने या पक्षातूनही विषय समित्यांठी अनेक महत्त्वाकांक्षी ऐनवेळी समोर येतील, हेही तेवढेच खरे. शिवाय राकॉं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही तसा आदेश दिला.