नांदेड नाक्यावरील पथदिवे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:30 AM2021-01-20T04:30:10+5:302021-01-20T04:30:10+5:30
रस्त्यावर पाणी; वाहनचालक त्रस्त हिंगोली: शहरातील पेन्शनपुरा, कापडगल्ली, तोफखाना आदी भागात नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ये-जा करण्यास ...
रस्त्यावर पाणी; वाहनचालक त्रस्त
हिंगोली: शहरातील पेन्शनपुरा, कापडगल्ली, तोफखाना आदी भागात नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ये-जा करण्यास वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन या भागातील नाल्यांची साफसफाई करून त्यावर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गतिरोधकाची मागणी
हिंगोली: शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर मागील काही दिवसांपासून वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रेल्वे उड्डाण पुलावर दुभाजक नसल्यामुळे वाहने अस्ताव्यस्त चालविली जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत आहे. संबंधित विभागाने उड्डाण पुलावर गतिरोधक आणि दुभाजक बसवून अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वानरे शहरात: वन विभागाचे दुर्लक्ष
हिंगोली: मागील १५ दिवसांपासून अन्न व पाण्याच्या शोधात वानरे शहरात दाखल होत आहेत. शहरातील गंगानगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, कापडगल्ली, मंगळवारा, तोफखाना, जिजामातानगर, वाशिम रोड आदी भागात वानरे घरावरून उड्या मारताना पाहायला मिळत आहेत. अंगणात ठेवलेल्या वस्तूंची नासाडी करीत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वन विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
विजेच्या लपंडावाला शेतकरी वैतागले
कळमनुरी: शहरासह परिसरातील अनेक गावांमध्ये विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. अचानक वीज खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. सद्य:स्थितीत शेतातील विहिरींना पाणी आहे; परंतु वीज खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करणे गरजेचे झाले आहे.
नाल्या स्वच्छ करण्याची मागणी
हिंगोली: शहरातील जिजामातानगर, नाईकनगर, तोफखाना, शास्त्रीनगर आदी भागातील नाल्या साफ करण्यात आल्या नाहीत. यामुळे या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
‘बसस्थानकातील धुळीचे प्रमाण कमी करावे’
हिंगोली: शहरातील बसस्थानकातील गिट्टी पूर्णत: निघून गेली असून धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाढत्या धुळीमुळे प्रवाशांना बसस्थानकात बसणेही कठीण होत आहे. धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार होत आहेत. आगार प्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकात डांबर मिश्रित गिट्टी टाकून दबाई करून धुळीचा बंदोबस्त करावा व प्रवाशांची गैरसोय दूर करणे गरजेचे आहे.