अंतरवाली सराटी येथील लाठीमारच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 06:07 PM2023-09-04T18:07:21+5:302023-09-04T18:07:37+5:30
जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद मागील दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात उमटत आहेत.
हिंगोली : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांवर लाठीमार करण्यात आला. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटत असून, ४ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.
जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद मागील दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात उमटत आहेत. २ सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यात आला. तर ३ सप्टेंबर रोजी कळमनुरी, सेनगाव तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ४ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या आवाहनाला व्यापाऱ्यांसह सर्वस्तरातून प्रतिसाद मिळाला असून, जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव या पाचही तालुक्याच्या ठिकाणांसह ग्रामीण भागात बंदला प्रतिसाद मिळला. आरोग्य सेवा वगळता इतर दुकाने, हाॅटेल बंद ठेवण्यात आली आहेत.
जिल्हाभरात चोख पोलिस बंदोबस्त...
जिल्हा बंदच्या पार्श्वभूमिवर पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी ३ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. तर ४ सप्टेंबर रोजी बंद दरम्यान जिल्हाभरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिंगोली शहरातील प्रमुख मार्ग, चौकांसह बाजारपेठेत पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी तैणात करण्यात आले आहेत.
तिसऱ्या दिवशीही ‘लालपरी’ची सेवा ठप्प...
आंदोलनकाळात काही जिल्ह्यांमध्ये बसची जाळपोळीच्या घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमिवर २ सप्टेंबरपासून हिंगोली, वसमत व कळमनुरी या तिन्ही आगार प्रशासनाकडून बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या तीन दिवसात जवळपास ५० लाख रूपयांच फटका बसला आहे. तर दुसरीकडे प्रवाशांचीही तारांबळ उडत आहे.