एस.टी.चे ‘सीमोल्लंघन; प्रवासी मात्र घरातच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:54+5:302021-07-09T04:19:54+5:30
हिंगोली : गत दीड-दोन महिन्यांपासून कोरोना महामारी ओसरत चालली आहे. त्यामुळे शासनाने एस. टी. महामंडळास ग्रामीण भाग वगळता लांब ...
हिंगोली : गत दीड-दोन महिन्यांपासून कोरोना महामारी ओसरत चालली आहे. त्यामुळे शासनाने एस. टी. महामंडळास ग्रामीण भाग वगळता लांब पल्ल्याच्या बस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु कोरोना महामारीच्या भीतीमुळे आजही प्रवासी प्रवास न करता घरातच बसणे पसंत करीत आहेत.
जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन एस. टी. महामंडळाचे आगार आहेत. आजमितीस हिंगोली आगारात ५६, वसमत आगारात ५१ आणि कळमनुरी आगारामध्ये ३६ बस आहेत. तिन्ही आगारांमध्ये हिंगोली आगारात चालक १२१, वाहक १२४, वसमत आगारात चालक १३०, वाहक १२० आणि कळमनुरी आगारात चालक ११८ आणि वाहक १११ कार्यरत आहेत. शासनाच्या सूचनेप्रमाणे पुणे, नाशिक, मुंबई, हैदराबाद, नांदेड, परभणी, अकोला, वाशीम, बुलडाणा आदी लांब पल्ल्याच्या बस सुरू केल्या आहेत. सर्वच बसला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंगोली व वसमत आगाराच्या दोन बस या हैदराबादला सोडल्या जातात.
जिल्ह्यात एकूण आगार ३
सध्या सुरू असलेल्या बस १०८
रोज एकूण फेऱ्या ३८७
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बस २
पुन्हा तोटा वाढला
कोरोना ओसरत चालल्यामुळे शासनाच्या अनुमतीनुसार हैदराबादसाठी हिंगोली आगारातून एक व वसमत आगारातून एक बस सोडण्यात येत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी संख्या म्हणावी तशी मिळत नाही. यामुळे एस. टी. महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. कोरोना आधी हैदराबादला बसला चांगला प्रतिसाद मिळत होता, असे एस. टी. महामंडळाने सांगितले.
दुसऱ्या राज्यात प्रवासी मिळेना
कोरोना महामारीच्या भीतीमुळे इतर राज्यांत सुरू केलेल्या बसला प्रवासी कमी प्रमाणात मिळत आहेत. हिंगोली व वसमत आगारातून हैदराबादसाठी एक-एक बस सुरू करण्यात आली आहे. कोरोनाआधी दुसऱ्या राज्यातील बसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळायचा. कोरोनामुळे उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.
ग्रामीण भागातील फेऱ्या बंद
कोरोनामुळे ग्रामीण भागातील फेऱ्या आजमितीस बंदच आहेत. शासनाची सूचना आल्यास ग्रामीण भागातील बस सुरू केल्या जातील. सध्या तरी प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या बस सुरू करण्यात आलेल्या आहेत.
परभणी-नांदेड मार्गावर प्रतिसाद
परभणी, नांदेड, अकोला, वाशिम आदी मार्गावर महामंडळाने बस सुरू केल्या आहेत. या मार्गावर प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासादरम्यान, चालक, वाहक व प्रवाशांना मास्क घालण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत, असे एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
फोटो