वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या; मुख्याध्यापक, वार्डनच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 05:46 PM2022-07-28T17:46:51+5:302022-07-28T17:47:55+5:30
मुख्याध्यापक, अधिक्षिकेस निलंबित करण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली आहे
आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : दहाव्या वर्गात शिकणाऱ्या निवासी शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी शिवानी सदाशिव वावधाने हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक व अधिक्षिका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. परंतु, आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांना तातडीने अटक करून निलंबित करावे या मागणीसाठी आज दुपारी आदिवासी पँथर संघटनेच्यावतीने बाळापुर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
दहाव्या वर्गात शिकणाऱ्या शिवानी वावधाने या मुलीने 21 जुलै रोजी शाळेच्या वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व अधिक्षिका यांच्याविरुद्ध कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेला आठ दिवस उलटले असले तरी अद्याप या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आले नाही, आरोपी खुलेआम मोकाट फिरत आहेत,पोलीस आरोपींना वाचवत आहेत, असा आरोप करत आदिवासी पॅंथर संघटनेच्यावतीने आज दुपारी बारा वाजता मोर्चा काढून पोलीस ठाण्यावर आंदोलन करण्यात आले.
हा मोर्चा कॄषि उत्पन्न बाजार समिती मैदानावरून निघून पोलीस ठाण्यावर दाखल झाला. मोर्चात मोठ्याप्रमाणात महिला-पुरुष सहभागी झाले होते. आदिवासी पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत माधवराव बोडके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. त्यांनी ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांना निवेदन सादर करून मयत मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत तपास योग्य दिशेने सुरू असून यातील सत्य लवकरच बाहेर येईल असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.
आंदोलकांनी थेट पोलीस ठाण्यात मोर्चा काढून न्यायाची मागणी केल्याने बाळापूर परिसरात मोर्चाची चर्चा होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानाजवळ आंदोलनकर्ते जमा झाले. त्यांनी बाळापुर ठाण्याकडे कुच करत असताना पोलिसांचा निषेध करण्यासाठी आणलेले काळे ध्वज पोलिसांनी जप्त केल्याचा आरोप आंदोलक खंदारे यांनी केला.