शिष्याने गुरूंना केले चितपट! वसमतच्या मतदारांचा राजू नवघरेंना कौल, सलग दुसऱ्यांदा आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:26 PM2024-11-23T18:26:49+5:302024-11-23T18:27:18+5:30
महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव
वसमत: विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. राजू नवघरे यांनी २९ हजार ४३२ मतांची आघाडी घेत महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव केला. अखेरपर्यंत अटीतटीच्या निवडणुकीत शिष्याने गुरुंना पराजीत केले, अशी चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळत आहे.
वसमत विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. ३ लाख ७६५ पैकी २ लाख ४० हजार ७३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून परभणी मार्गावरील आयटीआय येथे मतमोजणीस सुरुवात झाली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार आ. नवघरे यांनी ५ हजार मतांची आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीपर्यंत मतांची आघाडी त्यांच्याकडे होती. वसमत शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांना जवळपास ७ हजार मतांची मोठी आघाडी मिळाली त्यानंतर त्यांना मताधिक्य मिळवता आले नाही. महायुतीचे उमेदवार आ. राजू नवघरे यांनी योग्य नियोजन व कार्यकर्त्यांची शेवटच्या टप्यात बांधणी केली. त्यामुळे तर त्यांना विजय गाठता आला. आ. नवघरे यांचे गुरु जयप्रकाश दांडेगावकर यांचा त्यांनी पराभव करत अखेर त्यांना चितपट केले.
१५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक जाहीर झाली. तेंव्हापासून महायुती व महाविकास आघाडीने प्रचारात वेग घेतला होता. ४ नोव्हेंबर रोजी अनेकांनी अर्ज मागे घेतल्यांतर वसमत मतदारसंघात जयप्रकाश दांडेगावकर, आ. राजू नवघरे, गुरु पादेश्वर महाराज यांच्यामध्ये तिरंगी लढत होती. परंतु ज्यावेळी प्रचार संपला. त्यानंतर मात्र दांडेगावकर व नवघरे यांच्यापैकी एक उमेदवार विजयी उमेदवार विजयी होईल अशी शक्यता वर्तविली जात होती.
मतदारांनी आ राजू नवघरे यांना दिला कौल...
आतापर्यंत आ. नवघरे यांनी मतदारसंघात सिंचन,रस्ता,गाव पातळीवरील कामे,तसेच नेत्र शस्त्रक्रिया,गरजुना मदत,हाकेवर हजर होणे यासह आदी कामे केली आहेत. या कामाचे फलीत विधानसभेत सलग दुसऱ्या विजयातून आ. नवघरे यांना मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया मतदारांतून सुरु आहे.