धक्कादायक! हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थीनीला रुममध्ये कोंडून चौघांनी केली मारहाण
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: February 14, 2023 18:21 IST2023-02-14T18:18:54+5:302023-02-14T18:21:58+5:30
या प्रकरणी अधीक्षिका, उपप्राचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

धक्कादायक! हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थीनीला रुममध्ये कोंडून चौघांनी केली मारहाण
हिंगोली : सेलू (जि. परभणी) येथे इंग्रजी शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून ब्लेडने मारून जखमी केले. ही बाब वसतीगृह अधीक्षिका व उपप्राचार्यांना सांगितली असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी वसतीगृह अधीक्षिका व उपप्राचार्यांसह सहा जणांविरूद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
कळमनुरी तालुक्यातील १४ वर्षीय विद्यार्थीनी सेलू (जि. परभणी) येथे इंग्रजी शाळेत शिक्षण घेते. तसेच सेलू येथील एल.के. आर.आर प्रिन्स इंग्लीश स्कूल हॉस्टेल येथे निवासी राहते. २९ डिसेंबर २०२२ रोजी रात्री हॉस्टेलमध्ये असताना चार अनोळखी व्यक्तीने संगणमत करून हातपाय बांधले. त्यानंतर तोंडात रूमाल कोंबला. तसेच कपाळावर ब्लेडने मारून जखमी केले. ही घटना हॉस्टेल अधीक्षिका अनसूया गव्हाणे व उपप्राचार्य श्रीकृष्ण खरात यांना सांगितली. मात्र दोघांनीही जातीवाचक शिवीगाळ केली. विद्यार्थीनी गावाकडे आल्यानंतर ही बाब पालकांना सांगितली. तसेच कळमनुरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. यावरून पीडित मुलीच्या तक्रारीवरून हॉस्टेल अधीक्षिका, उपप्राचार्य व चार अनोळखी व्यक्तींविरूद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला.